निष्क्रियतेमुळे नगर दक्षिण मधून पराभव !
दादागिरीची भाषा संगमनेर तालुक्यात चालणार नाहीत — डॉ. जयश्री थोरात
प्रतिनिधी —
आमदार बाळासाहेब थोरात यांच्या अविश्रांत कामातून संगमनेर तालुका उभा राहिला आहे. येथील सहकार शिक्षण समाजकारण हे आदर्शवत आहे. मात्र हे बिघडवण्यासाठी आणि तरुणांची डोके भडकवण्यासाठी काही लोक बाहेरून येऊन भाषणं करत आहेत. दादागिरी आणि दडपशाही काय असते ही त्यांच्या भाषणातून कळत आहे. संगमनेर तालुका दादागिरी करत नाही आणि कुणाची दादागिरी सहन सुद्धा करत नाही असे सांगताना नगर मनमाड रस्ता ही त्यांची निष्क्रियतेची मोठी ओळख असल्याची टीका तालुका युवा काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांनी केली आहे.

चिखली, धांदरफळ, वडगाव लांडगा, जवळेकडलग, राजापूर येथे झालेल्या युवा संवाद यात्रेत त्या बोलत होत्या यावेळी समवेत चंद्रकांत कडलग, विष्णुपंत रहाटळ, विनोद हासे, श्रीराम पवार, दत्तू कोकणे, आनंद वर्पे बाळासाहेब कानवडे, प्रदीप हासे, आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते. या सर्व गावांमध्ये या युवा संवाद यात्रेचे अत्यंत उत्स्फूर्त स्वागत झाले.

डॉ. थोरात म्हणाल्या की, संगमनेर तालुका हा स्वातंत्र्यसैनिकांचा वारसा असलेला तालुका आहे. मोठ्या कष्टातून हा तालुका उभा राहिला आहे. आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली इथला सहकार शिक्षण ग्रामीण विकास हे राज्यासाठी आदर्शवत आहे.

सुसंस्कृत राजकारण हे संगमनेर तालुक्याचे वैशिष्ट्य आहे. तरुणांची चांगली पिढी घडवण्यासाठी काम येथे केले जात आहे .मात्र बाहेरून येणारे लोक माथी भडकवत आहेत. दादागिरी आणि दडपशाही काय असते हे त्यांच्या भाषणातून कळत आहे. नगर दक्षिणेमधून त्यांना पराभूत व्हावे लागले ते निष्क्रियतेमुळेच. गचक्यांचा रस्ता म्हणून प्रसिद्ध असलेला नगर मनमाड रस्ता हे निष्क्रियतेचे मोठे उदाहरण आहे. राहता तालुक्यातील सर्व सहकारी संस्था अडचणीत आहे. ज्यांनी अनेक संस्था बंद पाडल्या ते आता विकासाच्या गप्पा करत आहेत.

आमदार बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने पाठपुरावा करून निळवंडे धरण व कालवे पूर्ण केले ज्यांनी या कामात अडचणी निर्माण केल्या ते या कामाचे श्रेय घेण्याचा केविलवाणी प्रयत्न करत आहे. मात्र जनता यांना ओळखून आहे.
आपल्याला संस्कृत राजकारणाची परंपरा जपत पुढे जायचे आहे. तरुणांना भडकवून जातीभेद करून दादागिरी निर्माण करू पाहणाऱ्यांना सर्वांनी वेळीच रोखायचे आहे.

कुणी एक मारली तर दोन मारा हे हे सांगणे म्हणजे आपण कुठल्या लोकांचे भाषण ऐकत आहोत असा प्रश्न जनतेला पडला आहे. कारण असे हाणामारी आणि दडपशाहीचे राजकारण संगमनेर तालुक्याला माहीत नाही. त्यांचे राजकारण दोन चार भाषणांवरून जनतेला कळले आहे. एक महिन्यानंतर हे पुन्हा कोणाला दिसणार नाहीत असा टोला डॉ.थोरात यांनी लगावला.

