संगमनेर विधानसभा मतदारसंघ खर्चाच्यादृष्टीने संवेदनशील !

अवैध धंदे… पैसे वाटप…. अमली पदार्थाची विक्री आणि भ्रष्ट मार्गाचा अवलंब… संगमनेर आघाडीवर

प्रतिनिधी —

निवडणूक आयोगाने अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर व अहिल्यानगर शहर हे दोन विधानसभा मतदारसंघ “खर्चाच्या दृष्टीने संवेदनशील” ठरविले आहेत. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघांवर नजर ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाकडून अतिरिक्त पथके तैनात केली जाणार आहेत. निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी ही माहिती दिली.

खर्चाच्या दृष्टीने संवेदनशील म्हणजे काय? 

केंद्रीय निवडणूक आयोगाने गेल्या वर्षी ऑगस्ट २०२३ मध्ये तेलंगणा, राजस्थान, मिझोराम, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकी वेळी खर्चाच्या दृष्टीने संवेदनशील मतदारसंघ ही संकल्पना राबविली होती. त्यानंतर लोकसभेतही ही संकल्पना राबविली गेली. केवळ मतदारसंघच नव्हे तर मतदारसंघामधील खर्चाच्या दृष्टीने संवेदनशील भागांचा शोधही घेण्यास आयोगाने जिल्हा निवडणूक अधिकारी व मतदारसंघाच्या निवडणूक अधिकाऱ्यांना सांगितले आहे. आयोगाने त्यासाठी विविध निकष ठरवून दिले आहेत.

अवैध धंदे… पैसे वाटप…. अमली पदार्थाची विक्री आणि भ्रष्ट मार्गाचा अवलंब… संगमनेर जिल्ह्यात आघाडीवर 

ज्या ठिकाणच्या विधानसभा मतदारसंघाच्या गेल्या दोन निवडणुकांमध्ये पैसे वाटप, दारू वाटप, अंमली पदार्थ व्यवसाय, गैरप्रकार, भ्रष्ट मार्गाचा अवलंब याच्या तक्रारी झाल्या, गुन्हे दाखल झाले, त्या मतदारसंघाचा पूर्वइतिहास पोलिसांसह विविध अंमलबजावणी संचालनालयाचे अहवाल यानुसार हे खर्चाच्या दृष्टीने संवेदनशील मतदारसंघ निवडले गेले आहेत.

याशिवाय निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच्या सहा महिन्यांत त्या मतदारसंघातून चलनाच्या मागणीत २० टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाल्याचा भारतीय रिझर्व बँकेचा अहवाल, काही मोजक्या खात्यातून प्रचंड मोठ्या संख्येच्या खात्यांमध्ये जमा होणाऱ्या रकमा, गेल्या सहा महिन्यात वाढलेले ऑनलाइन व डिजिटल पेमेंट, अशा विविध निकषानुसार खर्चाच्या दृष्टीने संवेदनशील मतदारसंघ निवडले गेले आहेत. त्यामध्ये संगमनेरचा नंबर लागला आहे.

निवडणूक निरीक्षकांवर जबाबदारी…

खर्चाच्या दृष्टीने संवेदनशील मतदारसंघांवर नजर ठेवण्यासाठी इतर मतदारसंघांपेक्षा अतिरिक्त पथके नियुक्त केली जाणार आहेत. याबरोबरच खर्चविषयक निवडणूक निरीक्षकांनी मतदारसंघाला भेट देताना तेथील विविध भागही शोधायचे आहेत.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!