‘त्या’ उपोषणकर्त्या कुटुंबाचा प्रश्न मार्गी लागला…

संगमनेरच्या प्रांत अधिकाऱ्यांची महत्त्वाची भूमिका

प्रतिनिधी —

वहिवाटिस बंद केलेला रस्ता पुन्हा सुरू करण्यासाठी अडीच वर्षाच्या बालकासह संपूर्ण कुटुंबाचे संगमनेर प्रांत कार्यालयासमोर उपोषण सुरू होऊन चार दिवसाचा कालावधी उलटला तरी देखील मार्ग निघाला नव्हता. अखेरीस प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सकारात्मकतेने उपोषणार्थींची समस्या लक्षात घेत त्यांना सोमवारी सकाळी दोन पर्यायी रस्ते काढून दिले. असे असले तरी मूळ बंद केलेल्या रस्त्याबाबत अपील सुरूच राहणार आहे. यामध्ये प्रांत अधिकारी शैलेश हिंगे यांनी पुढाकाराने महत्त्वाची भूमिका बजावली.

रस्ता केस मध्ये तहसीलदारांनी उपोषणकर्त्यांच्या बाजूने निर्णय देऊन देखील रस्ता वहिवाटीला खुला करून देण्यात आला नाही. उलट तहसीलदारांच्या निर्णयाविरोधात प्रांत अधिकाऱ्यांकडे अपील दाखल करण्यात आले. दादागिरीने रस्ता बंद करून कुटुंबाला रस्त्यापासून वंचित ठेवणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्यात यावी आणि येण्या जाण्याचा रस्ता मिळावा, संबंधितांवर कारवाई करावी यासाठी पीडित कुटुंबीयांनी अडीच वर्षाच्या मुलासह प्रांत अधिकारी शैलेश हिंगे यांच्या कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते.

संगमनेर तालुक्यातील वडगाव लांडगा येथील मच्छिंद्र गोविंद वाकचौरे, हौसाबाई गोविंद वाकचौरे, साईनाथ मच्छिंद्र वाकचौरे हे आपल्या मयंक साईनाथ वाकचौरे या अडीच वर्षाच्या बालकासह ऊन वारा पाऊस असताना देखील उघड्यावर उपोषणास बसले होते. त्यांच्या उपोषणातून मार्ग काढण्याऐवजी पोलीस प्रशासनाकडून आचारसंहितेचे कारण देत उपोषण गुंडाळून घेण्याचा सल्ला त्यांना एका नोटीसीद्वारे देण्यात आला.

वाकचौरे यांचे वडगाव लांडगा येथे घर आहे. या घरा कडे जाण्यासाठी गावातून आलेला पूर्वापार रस्ता आहे. हा रस्ता ज्यांच्या शेतातून जातो ते अभिराज सुभाष मालुंजकर, सोपान श्रीरंग लांडगे, संगीता अशोक मालुंजकर (सर्व राहणार वडगाव लांडगा, तालुका संगमनेर) यांनी हा रस्ता बंद केला असून या रस्त्याने येण्या जाण्यास वाकचौरे यांना मज्जाव केला आहे. त्या विरोधात वाकचौरे यांनी तहसीलदारांकडे तक्रार केली होती.

संगमनेरच्या तहसीलदारांनी याबाबत निकाल देऊन त्यात म्हटले होते की, वडगाव लांडगा येथील अर्जदार वाकचौरे यांचा गट क्रमांक १०५८ मध्ये येण्या-जाण्यासाठी गट क्रमांक १०५५ आणि १०५६ मधून असणारा पूर्वापार वहिवाटीच्या रस्त्यात निर्माण केलेला अडथळा त्वरित दूर करून रस्ता पूर्ववत खुला करून द्यावा आणि भविष्यात कुठलाही अडथळा वाकचौरे यांना करण्यात येऊ नये असा आदेश दिला होता. मात्र त्यावर कुठलीही कार्यवाही झाली नसून हा रस्ता बंद ठेवण्यात आलेला आहे.

दरम्यान या संदर्भात तहसीलदारांच्या निकालाविरोधात मालुंजकर यांनी प्रांत अधिकारी यांच्याकडे अपील केले होते. मात्र प्रांत अधिकारी यांच्यावर अविश्वास दाखवत सदर केस मला दुसऱ्या कोर्टात चालवायची आहे असे म्हणत हरकत घेतली आहे. त्यामुळे तांत्रिक बाबी आणि याप्रकरणी निकाल देण्याचे अधिकार आता दुसरीकडे असल्याने कायदेशीर बाबीतील अडचणींमुळे हे प्रकरण अडचणीत सापडले.

मात्र उपोषणार्थींची अडचण लक्षात घेत या संदर्भातील बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर महाराष्ट्र संवाद न्यूजचे संपादक अनंत पांगारकर, पंचायत समितीचे माजी सदस्य सरूनाथ उंबरकर, सामाजिक कार्यकर्ते अण्णासाहेब गोडसे, बाजीराव गोडसे यांनी प्रांताधिकारी शैलेश हिंगे, तहसीलदार धीरज मांजरे यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी या प्रकरणातील वस्तुस्थिती माध्यमांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर उपोषणार्थींची समजूत काढल्यावर उपोषण मागे घेण्यात आले.

परंतू संबंधित कुटुंबीयांना येण्या जाण्यासाठी असलेला पर्याय रस्ता देखील बंद असल्याचे तसेच कुटुंबीयांना आपल्या घराकडे येण्या जाण्यासाठी रस्ता नसल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी सोमवारी तातडीने महसूलच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठवत पर्यायी दोन रस्ते वाकचौरे कुटुंबीयांना उपलब्ध करून दिले आहेत. पर्यायी रस्ते दिले असले तरी मुख्य पूर्वापार रस्त्याचा निकाल लागल्यानंतर त्यावर कार्यवाही केली जाईल.

RRAJA VARAT

One thought on “‘त्या’ उपोषणकर्त्या कुटुंबाचा प्रश्न मार्गी लागला…”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!