भाजपच्या राजवटीमध्ये विकृत मानसिकता वाढली — खासदार प्रणिती शिंदे

इंदिरा महोत्सवातून महिलांना स्वयंरोजगारासाठी मोठे व्यासपीठ

प्रतिनिधी — 

महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा आहे. मात्र आज महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज, महिला, चिमुकल्या सुरक्षित नाहीत. भाजपच्या राजवटीमध्ये विकृत मानसिकता वाढली असून महिलांवरील अत्याचार भ्रष्टाचार वाढले आहेत. कायदे बनवले आहेत. परंतु महिला पुढे येण्याचे धाडस करत नाहीत. बदलापूर घटनेनंतर पोलीस एफआयआर दाखल करून घेत नव्हते. दिल्लीमध्ये कुस्तीपटूंवर झालेल्या अन्यायाची कोणी दखल घेत नाहीत. आज महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाहीत अशी प्रतिक्रिया खासदार प्रणिती शिंदे यांनी  व्यक्त केली.

बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका हा समृद्ध असून महिलांना सातत्याने सन्मान मिळतो आहे. महिलांच्या स्वयंरोजगारासाठी डॉ. जयश्री थोरात यांच्या संकल्पनेतील इंदिरा महोत्सव हे मोठे व्यासपीठ ठरणार असून महिलांना मानसिक व आर्थिक  सक्षम करणारा हा इंदिरा महोत्सव असल्याचे गौरवोद्गार खासदार प्रणिती शिंदे यांनी काढले आहेत.

संगमनेर साखर कारखाना कार्यस्थळावर एकविरा फाउंडेशन अमृत उद्योग समूहाच्या पुढाकारातून इंदिरा महोत्सव शुभारंभ प्रसंगी कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, कांचनताई थोरात, दुर्गाताई तांबे, आयोजक डॉ. जयश्री थोरात, शरयूताई देशमुख, प्रभावती घोगरे, लिज्जत पापडचे सुरेश कोते , कापसे पैठणीचे बाळासाहेब कापसे, व्याख्याते गणेश शिंदे, केशव कांबळे, वंदना पाटील, मनीषा कटके, शरद नानापुरे, कुणाल दुसाने, अमित मनोरे, सतीश दवंगे, भावना बच्छाव, आदी उपस्थित होते.

खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, काँग्रेसने महिलांना आरक्षण दिले त्यामुळे महिलांना सर्वत्र काम करण्याची संधी मिळते आहे. तालुक्यातील बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या मालांना विक्रीसाठी बाजारपेठ निर्माण करून देण्याचे काम डॉ. थोरात यांनी केले आहे. महिला मानसिक व सक्षमीकरणासाठी आमदार थोरात यांच्या नेतृत्वाखाली या तालुक्यात काम होत आहे. हा आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे.

खासदार भाऊसाहेब वाकचौरे म्हणाले की,  महिलांमध्ये समाज परिवर्तनाची सर्वात मोठी ताकद असून बचत गटाची मोठी चळवळ या तालुक्यात आहे. बचत गटातील महिलांसाठी विविध केंद्रीय योजना मिळवून देण्यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करू असेही ते म्हणाले.

डॉ तांबे म्हणाले, काही शक्ती पुन्हा महिलांना गुलाम बनू पाहत आहेत. महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. म्हणून महिलांनी आत्मचिंतन करा. देशाला कणखर नेतृत्व देणाऱ्या इंदिरा गांधी होत्या त्यांच्याप्रमाणे कणखर व्हा असे आवाहन त्यांनी केले.

डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या की, दूध व्यवसायामध्ये महिलांचे मोठे योगदान आहे. मात्र प्रत्येक महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावी यासाठी आपण सातत्याने काम करत असून गृह उद्योग, रोजगार, प्रशिक्षण याचबरोबर महिलांचे आरोग्य याकरता या इंदिरा महोत्सवातून दोन दिवस विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे.

याप्रसंगी दुर्गाताई तांबे, रणजीतसिंह देशमुख, सुरेश कोते यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी बचत गटातील महिलांसह तालुक्यातील  महिला प्रचंड संख्येने उपस्थित होत्या. यानंतर उद्योजक बाळासाहेब कापसे, केशव कांबळे, सुरेश कोते, वंदना पाटील, शरद नानापुरे, कुणाल दुसाने, अमित मनोरे, सतीश दवंगे यांनी उद्योजकतेबाबत महिलांशी संवाद साधला.

महिला स्वयंपूर्ण व्हावी यासाठी प्रयत्न – आमदार थोरात

राजीव गांधी यांनी आरक्षण मांडले आणि त्यातून महिलांना विविध संस्थांमध्ये प्रतिनिधित्व मिळाले. बचत गटात अनेक महिला भगिनी असून त्यांच्या कुटुंबास आर्थिक मदत व्हावी यासाठी रोजगार स्वयंरोजगाराची संधी देण्याची ही सुरुवात आहे.  एक चांगला आदर्शवत आणि समृद्ध तालुका बनून संगमनेर तालुका देशाला दिशादर्शक ठरावा यासाठी आपण सर्वजण काम करूया अशा शुभेच्छा काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी ऑनलाइन पद्धतीने मुंबईतून  दिल्या.

इंदिरा महोत्सवात महिलांसाठी भरगच्च कार्यक्रम

इंदिरा महोत्सवात सर्व महिलांची नोंदणी करण्यात येत असून त्यांची आरोग्य तपासणी होत आहे.  याचबरोबर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील 51 कंपन्या सहभागी झाले असून त्यातून अनेक महिलांना रोजगारासाठी करारबद्ध केले आहे. याचबरोबर पॅनल डिस्कशन मधून रोजगार स्वयंरोजगाराचे मार्गदर्शन, विविध बँकांचे प्रतिनिधी हजर राहून महिलांना कर्ज प्रकरणाबाबत मार्गदर्शन करत आहेत. अत्यंत चांगली सुविधा, बैठक व्यवस्था, पार्किंग व्यवस्था यांसह सर्व सुविधा असल्याने सुमारे पंधरा हजार महिलांची मोठी उपस्थिती हे या इंदिरा महोत्सवाचे वैशिष्ट्य ठरले आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!