बदलापूर घटनेच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये भव्य निषेध मोर्चा !
हजारो विद्यार्थिनींनी रस्त्यावर उतरून आरोपीला फाशी देण्याची केली जोरदार मागणी
प्रतिनिधी —
बदलापूर येथील शाळेत अल्पवयीन मुलीवर झालेल्या घृणास्पद लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ संगमनेर मध्ये हजारो विद्यार्थिनी व महिलांनी रस्त्यावर उतरून तीव्र निषेध करत या आरोपींना फाशी देण्याची आग्रही मागणी केली तर अशा नराधम आरोपींना चौकामध्ये जिवंत जाळा असा तीव्र संताप महिला नेत्या दुर्गाताई तांबे यांनी व्यक्त केला आहे.

संगमनेर शहरात जयहिंद महिला मंच, एकविरा फाउंडेशन व विविध महिला संघटनांच्या वतीने भव्य निषेध मोर्चा झाला यामध्ये दुर्गाताई तांबे, सुनीता कोडे, अर्चना बालोडे, डॉ. श्रद्धा वाणी, सुनीता कांदळकर, शितल उगलमुगले, सुरभी मोरे, मनीषा शिंदे, नम्रता पवार, अमृता राऊत, सोसे, यांच्यासह शेकडो मुली सहभागी झाल्या होत्या.

सह्याद्री विद्यालयापासून निघालेल्या या मोर्चात विद्यार्थिनींनी नवीन नगर रोड, लिंक रोड, पुणे नाशिक हायवे ते बस स्थानक अशा निषेध मोर्चात नराधम आरोपींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. फाशी द्या, फाशी द्या आरोपींना फाशी द्या, मुलगी वाचवा देश वाचवा, फुल नही, चिंगारी है, ये भारत की नारी है, अशा घोषणा देऊन या आरोपींना तात्काळ फाशी द्या अशी मागणी केली.

दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, काही समाजकंटकांना महिलांना पुन्हा पारतंत्र्यात न्यायचे आहे. पूर्वी महिलांना सती जाण्यासाठी जाळले जायचे .आता हजारो महिलांची गर्भपात करून जीव घेतले जात आहेत. महिलांना घटनेने अधिकार दिला आहे. परंतु तो हिसकावून घेतला जात आहे. आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुढे आहेत. परंतु अजूनही त्यांना हीन वागणूक दिली जात आहे. काही नराधम समाजकंटक लहान लहान मुलींना अत्याचार करून त्यांना खुडून टाकण्याचे काम करत आहेत .त्यामुळे राज्यातील हजारो मुली घाबरल्या आहेत. पालक मुलींना शाळेत पाठवायला तयार नाहीत .

आम्ही लहानपणी मुक्त फिरायचो त्यावेळेस सर्वांचे जीवन चांगले गेले. परंतु या आत्ताच्या लहान मुलींचे कसे होणार असे सांगताना दुर्गाताई तांबे यांना अश्रू आनावर झाले याचबरोबर अशा नराधम समाजकंटकांना भर चौकात जाळा अशा संतप्त भावना त्यांनी व्यक्त केल्या.
