शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचा सापळा !

संगमनेरच्या व्यापाऱ्याची लाखो रुपयांची फसवणूक !!

पती-पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल

प्रतिनिधी — 

शेअर मार्केट मध्ये पैशांची गुंतवणूक करून जास्त व्याजदराने पैसे मिळवून देतो त्यातून मोठा लाभ होईल असे आमिष दाखवून लावलेल्या सापळ्यात अडकलेल्या संगमनेर येथील व्यापारी संकेत शिवाजी कोकणे यांना एका जोडप्याने लाखो रुपयांना फसवले असून या जोडप्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शशांक चंद्रशेखर वडके आणि प्रियांका शशांक वडके (राहणार 276, भिवंडी, जिल्हा ठाणे) या दोघा पती-पत्नी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

याबाबतची हकीकत अशी की, संकेत कोकणे (कॉटन किंग, मेनरोड, संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मित्राच्या माध्यमातून भेटलेल्या शशांक वडके याने शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी त्याची पत्नी प्रियंका हिची एजन्सी असून सहा टक्के दराने पैसे मिळतील व त्यातून फायदा होईल असे सांगितले. त्यानुसार कोकणे यांनी ग्लोब कम्युनिटीज कन्सल्टन्सी, ठाणे या नावावर दिनांक 16/ 5/ 2019 रोजी 20 लाख रुपये आरटीजीएस द्वारा भरले. त्यानंतर दिनांक 17/ 5/ 2019 रोजी 5 लाख रुपये आरटीजीएस द्वारा भरले आणि 20/ 5/ 2019 रोजी 2 लाख रुपये रोख रक्कम शशांक वडके यांना दिली. असे एकूण 30 लाख रुपये कोकणे यांनी दिले.

शशांक वडके यांनी कोकणे यांना मी तुमचे अकाउंट काढतो आणि स्वतः चालवतो व तुम्हाला सहा टक्के दराने पैसे देतो असे सांगितले होते. मी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज येथे नोकरी करत आहे असेही कोकणे यांना सांगून ग्लोब कॅपिटल मार्केटिंग लिमिटेड या कंपनीची त्याची पत्नी प्रियंका हिच्या कडे एजन्सी असल्याचे त्याने कोकणे यांना भासविले होते. त्यानंतर साधारण पाच ते सहा महिने प्रत्येक महिन्याला दहा ते पंधरा हजार रुपये एवढी रक्कम कोकणे यांना तो देत होता.

मात्र एवढी मोठी रक्कम देऊन एवढे कमी पैसे कसे येतात याचा संशय कोकणे यांना आला व त्यांनी पैसे मागण्या सुरुवात केली. काही दिवसांनी कोकणे यांनी मला पैसे गुंतवायचे नाहीत माझे संपूर्ण पैसे परत द्यावेत अशी मागणी सुरू केली. त्यावेळी वडके याने आठ ते दहा दिवसात तुमचे पैसे देतो असे सांगून पैसे देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर कोकणे यांनी फोनवर संपर्क साधून वडके यांना पैसे परत देण्याचा तगादा लावला. मात्र वडके याने मोबाईल फोन बंद करून तो नंतर संपर्कात येण्याचे टाळू लागला. त्यामुळे कोकणे यांना अधिकच संशय आला. अधिक माहिती घेतली असता कोकणे यांच्या नावावर कोणतेही खाते नसल्याचे आणि ग्लोब कॅपिटल मार्केटिंग कंपनीत कुठलेही रजिस्ट्रेशन नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी या कंपनीकडे पैशाची मागणी केली असता कोकणे यांना फक्त 3 लाख 54 हजार 828 रुपये परत देण्यात आले. त्यामुळे उरलेल्या 26 लाख 45 हजार 172 रुपयांची शशांक वडके आणि त्याची पत्नी प्रियांका वडके या दोघांनी फसवणूक केली असल्याची फिर्याद कोकणे याने संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.

या संदर्भात कोकणे यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीत सांगितले आहे की, सदर दांपत्याची ओळख त्यांच्या एका जवळच्या मित्राने करून दिली होती. तसेच या सर्व व्यवहारात त्यांचे आणखी दोन जवळचे मित्र देखील साक्षीदार होते. त्यामुळे कोकणे आणि त्यांचे तीन मित्र यांना या पकरणी अधिक माहिती असल्याने त्या दृष्टीने पोलीस तपास करीत असल्याचे समजले आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!