घोटाळेबाज पदाधिकाऱ्यांमुळे आमदार बाळासाहेब थोरात यांची बदनामी !

काँग्रेस अध्यक्ष मिलिंद कानवडे यांचा जमीन घोटाळा चर्चेत 

बडे उद्योजक आणि त्यांच्या टोळीने चालवलेल्या ‘मुळशी पॅटर्नचे काय ?

प्रतिनिधी —

संगमनेर आणि अकोले तालुक्यातील जमिनी खरेदी-वक्रीचा ‘मुळशी पॅटर्न’ उघड झाल्यानंतर माझी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या निकटचे आणि त्यांच्या ताब्यात असलेल्या संस्थांवरचे आणि पक्षांचे पदाधिकारी अशा जमीन व्यवहारांच्या घोटाळ्यात अडकलेले असल्याचे समोर येत असून आमदार थोरात यांच्याकडून दुर्लक्ष होत आहे की दुर्लक्ष केले जात आहे हा आता चर्चेचा विषय ठरला आहे. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याचे नाव समोर आले असले तरी बडे उद्योजक आणि त्यांच्या बगलबच्चांनी गेल्या अनेक वर्षांपासून चालवलेल्या या टोळीच्या जमीन गैरव्यवहाराच्या ‘मुळशी पॅटर्न’चे काय असाही सवाल उपस्थित केला जात आहे.

संगमनेर – अकोले तालुक्यातील जमिनीचा वादग्रस्त ‘मुळशी पॅटर्न’ संगमनेर टाइम्सने चव्हाट्यावर आणला. या व्यवहाराच्या अनेक तक्रारी जिल्हाधिकारी व विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे करण्यात आलेल्या आहेत. अद्याप या तक्रारींवर कुठलीही कारवाई झालेली नाही. कारवाई होण्याच्या मार्गावरच असताना त्यात अडथळे आणले जात असल्याचे दिसून येत आहे.

संगमनेर – अकोले तालुक्यातील राजकीय पुढाऱ्यांनी जमीन खरेदी विक्रीचा नियमबाह्य उद्योग जोरात चालवला असून आदिवासी, वन जमिनी, शर्तीच्या जमिनी, राखीव जमिनी आणि ज्या जमिनीची खरेदी विक्री होऊ शकत नाही अशा सर्व जमिनी साम, दाम, दंड, भेद आणि राजकीय पदांचा वापर करीत बिनदीक्कतपणे खरेदी विक्रीचे व्यवहार केले आहेत. महसूल विभागाला हाताशी धरून असे उद्योग होणे शक्य नाही. महसूल विभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी अशा ‘लँड माफीयांना’ हाताशी धरून संगमनेर अकोले तालुक्यात ‘मुळशी पॅटर्न’ प्रमाणे उद्योग केले आहेत.

या पॅटर्नमध्ये दादागिरी बरोबरच महसूल, भूमी अभिलेख, वनविभाग या महत्त्वाच्या शासकीय अधिकाऱ्यांना मलिदा वाटप करून लँड माफियांनी आपला कार्यभाग साधला आहे. यामध्ये सत्तेच्या खुर्च्या मिळालेल्या बड्या नेत्यांच्या नातेवाईकांचा, भाऊबंदांचा, सगे सोयऱ्यांचा मोठा सहभाग आणि वाटा आहे. बड्या उद्योजकांसह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी ही यात सहभागी आहेत. महसूल विभागातले काही रिटायर झालेले अधिकारी व काहींनी व्हॅलेंटरी रिटायरमेंट घेऊन मंत्रालयात बसून असे उद्योग केले असल्याची देखील चर्चा आहे.

‘संगमनेर टाइम्स’ ने नुकतीच एक मालिका प्रसिद्ध केली. या मालिकेमध्ये संगमनेर – अकोले तालुक्यातील जमिनींचे कसे अवैध व्यवहार झाले आहेत हे स्पष्टपणे उघड केले आहे. या सर्व कागदपत्रांमध्ये असले जमिनीचे अवैध व्यवहार करणाऱ्यांची नावे सुध्दा उपलब्ध आहेत. स्थानिक महसूल विभाग तर अशा उद्योगात सराईत असल्याचे उघड झाले आहे. मोक्यावरच्या जागा, जमिनी बिल्डर मंडळींना हाताशी धरून घशात घालण्यात आल्या आहेत. संगमनेरातले लँड डेव्हलपर्स, बिल्डर्स, उद्योजक हे आदिवासी भागात पोहोचले असून तेथे देखील एका माजी महसूल अधिकाऱ्याला हाताशी धरून जमिनीचे व्यवहार झाले आहेत.

संगमनेर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि संगमनेर साखर कारखान्याचे माजी चेअरमन ॲड. माधवराव कानवडे यांचे चिरंजीव मिलिंद कानवडे हे आपल्या ताब्यातील जमीन अशाच पद्धतीने लाटण्याचे षडयंत्र करीत असल्याचा आरोप करून संगमनेर खुर्द येथील एका शेतकऱ्याने स्वातंत्र्यदिनी (15 ऑगस्ट) आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. अशा लोकांना पाठीशी घालण्यात कोणाचा हात आहे हे सुद्धा उघड व्हायला हवे. या लोकांच्या उद्योगामुळे आमदार बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या स्वच्छ कारभार असणाऱ्या नेत्याची नाहक बदनामी होत असल्याच्या प्रतिक्रिया काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.

टोळी उघड व्हायला हवी….

संगमनेर अकोले तालुक्यात असे उद्योग करणारी एक ‘टोळी’ कार्यरत असल्याची चर्चा आहे. या टोळीमध्ये वादग्रस्त मिलिंद कानवडे यांच्यासह बडे उद्योजक आणि त्यांचे साथीदार देखील असल्याचे बोलले जात आहे. तसेच यात महसूल विभागातले काही आजी-माजी अधिकारी देखील आपापल्या वाट्यानुसार सहभाग नोंदवीत असतात. महसूल विभागात उपायुक्त दर्जाच्या तत्कालीन ओएसडीने (OSD) संगमनेर तालुक्यात असे उद्योग केल्याची थेट तक्रार करण्यात आलेली आहे. बोगस व्यवहार करून सरकारच्या आणि गोरगरिबांच्या जमिनी हडपल्या नसतील तर स्वच्छ चारित्र्याच्या या मंडळींनी ‘आम्ही टोळीचे सदस्य नाही’ हे दाखवून द्यायला हवे. या टोळीचा ‘सुसंस्कृत आणि संस्कारीत’ म्होरक्या कोण हा सुद्धा चर्चेचा विषय आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!