छात्रभारती, संभाजी ब्रिगेडने
सातारा पोलिसांना पाठवले कॉ. गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता ? पुस्तक
प्रतिनिधी —
संपूर्ण भारतभर नावाजलेले कॉम्रेड स्वर्गीय गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता ? या पुस्तकाचा संदर्भ दिला म्हणून सातारा येथील प्राध्यापक मृणालिनी आहेर यांच्यावर सातारा पोलिसांनी कारवाई केली. त्या निषेधार्थ आणि पोलिसांना या पुस्तकात नेमके काय लिहिले आहे हे समजण्यासाठी व त्याचे भान येण्यासाठी संगमनेर छात्रभारती आणि संभाजी ब्रिगेडने सातारा पोलिसांना हे पुस्तक पाठविले आहे.

सातारा येथील प्रा. मृणालिनी आहेर यांच्यावर रयत शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात शिवाजी कोण होता ? ह्या पुस्तकाचा रेफरन्स दिला म्हणून बेकायदा कारवाईचा बडगा दाखवण्यात आला. राज्य सरकारने ह्या गोष्टीचे समर्थन केले. उच्च न्यायालयाने मात्र राज्य सरकार व पोलिसांवर ताशेरे ओढले. हे पुस्तक तुम्ही वाचले आहे का ? असा सवाल केला.

पानसरे यांनी खरे शिवराय लोकांसमोर आणले. शिवरायांची खरी ओळख लोकांपर्यंत पोहचवली. त्यांचा खून करून त्यांना संपवले गेले. ज्यांनी पुस्तक वाचलंचं नाही ते चुकीची माहिती पसरविण्याचे काम करत असतात. काही संघटना शिवरायांना धर्मवादी ठरवितात. जातीय धार्मिक रंग देण्याचे काम करतात. खरे शिवराय लोकांपर्यंत ज्या पुस्तकाने पोहचवले त्याचा काहितरी चुकीचा अर्थ काढून वाद निर्माण करण्यात येतो. पोलिस कुठलीही खात्री न करता गुन्हे दाखल करण्याची धमकी देणे हे योग्य नसल्याचे या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.

छात्रभारती, संभाजी ब्रिगेडच्या वतीने संगमनेर पोस्टाच्या मार्फत सातारा पोलिसांना शिवाजी कोण होता ? ह्या पुस्तकाच्या प्रति पाठवल्या आहेत. छात्रभारतीने पाच लाख पुस्तकं महाराष्ट्रातील घरा घरात पोहचवण्याचे काम केले आहे. या वेळी छात्रभारतीचे राज्य कार्यवाह अनिकेत घुले, गणेश जोंधळे, राहुल जऱ्हाड, तृप्ती जोर्वेकर, मोहम्मद तांबोळी, कल्याणी घेगडमल, संभाजी ब्रिगेडचे राम अरगडे उपस्थित होते.
