दूध दर प्रश्नी कोतुळ ते संगमनेर भव्य ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन 

प्रतिनिधी —

दुधाला प्रतिलिटर 40 रुपये भाव मिळावा यासाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने राज्यभर आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामध्ये कोतुळ या ठिकाणी शेतकरी धरणे आंदोलनास बसले असून दूध हंडी, कोतुळ बंद, शेतकरी मेळावा अशा विविध मार्गाने आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा ते प्रयत्न करत आहेत. संगमनेर तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दूध आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कोतुळ ते संगमनेर प्रांत कार्यालय या 55 किलोमीटर अंतरामध्ये शेकडो ट्रॅक्टर व ट्रॉली यांची भव्य रॅली काढण्याचे नियोजन केले आहे.

आंदोलनाच्या 18 व्या दिवशी दिनांक 23 जुलै 2024 रोजी या ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आले असून परिसरातील शेकडो शेतकरी ट्रॅक्टर व ट्रॉलीवर दूध उत्पादनाशी संबंधित विविध साधने सजवून ट्रॅक्टर रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत.

दुधाला प्रति लिटर 40 रुपये भाव मिळावा व दूध प्रश्न कायमचा सुटावा यासाठी दुधाला एफ. आर. पी. व रिव्हेन्यू शेअरिंगचे धोरण लागू करावे, पशुखाद्याचे दर कमी करावेत, दूध भेसळ तातडीने थांबवावी, आदी मागण्यासाठी ही ट्रॅक्टर रॅली काढण्यात येणार आहे.

दूध धंदयातील सर्व उत्पन्न सरकारच्या धोरणामुळे खाजगी व सहकारी दूध संघ व इतरांनी लुटून नेले आहे. शेतकऱ्याला या व्यवसायातून केवळ शेणच शिल्लक राहत आहे. अशा पार्श्वभूमीवर ते तरी कशाला ठेवता ते शेणही घेऊन जा, अशा प्रकारची शेतकऱ्यांमध्ये भावना आहे. ट्रॅक्टर रॅलीच्या सुरुवातीला शेणाने भरलेला ट्रॅक्टर असणार असून, हे शेण सुद्धा सरकारने घेऊन जावे अशा प्रकारची भावना या द्वारे व्यक्त केली जाणार आहे.

कोतुळ  येथून निघणारी ही रॅली दूध उत्पादनाचा पट्टा असलेल्या धामणगाव पाट, धामणगाव आवारी, अकोले तहसील कार्यालय,  कळस, चिखली मार्गे, संगमनेर शहरात दाखल होणार आहे. या रॅलीमध्ये अकोले व संगमनेर तालुक्यातील दूध उत्पादकांनी मोठ्या संख्येने सामील व्हावे असे आवाहन आंदोलकांच्या वतीने डॉ. अजित नवले, सदाशिव साबळे, विनोद देशमुख, अभिजित सुरेश देशमुख, नामदेव साबळे, बाळासाहेब गीते,  प्रकाश देशमुख, भाऊसाहेब देशमुख, अभिजित भाऊसाहेब देशमुख, गणेश जाधव,योगेश बाळासाहेब देशमुख, गौरव बनोटे, सुनील आरोटे, राजेंद्र देशमाने, दीपक पवार यांनी केले  आले आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!