संगमनेर युवक काँग्रेस पदाधिकारी निवडीवरून कार्यकर्त्यांमध्ये नाराजी !

पक्षीय कामापासून अलिप्त राहण्याच्या मनस्थितीत अनेक कार्यकर्ते

प्रतिनिधी  —

माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली युवक काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष डॉक्टर जयश्री थोरात यांनी नुकत्याच संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या आणि शहर युवक काँग्रेसच्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीची घोषणा केली. मात्र या निवडीवरून व अपेक्षित आणि हक्काची असलेली पदे न मिळाल्याने अनेक कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली असून काही कार्यकर्ते पक्षीय कामकाज थांबवण्याच्या मनस्थितीत असल्याचे बोलून दाखवतात.

मोठा गाजावाजा करीत संगमनेर तालुका व शहर युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या पदांचे वाटप करण्यात आले. जम्बो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये कार्याध्यक्ष, उपाध्यक्ष, संघटन अशी अनेक निर्माण करण्यात येऊन पदे देण्यात आली. तसेच एकाच पदावर अनेक कार्यकर्त्यांची वर्णी लावण्यात आली. मात्र अशा या भरमसाठ निवडींमुळे प्रामाणिक आणि अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या काही कार्यकर्त्यांनी नाव न सांगण्याच्या बोलीवर नाराजी व्यक्त केली आहे. नाव सांगितले तर विनाकारण त्रास होईल या भीतीने कार्यकर्ते थेट नावाचा उल्लेख करून आपले म्हणणे मांडणे टाळतात. त्यामुळे पक्षीय कार्यकर्त्यांवर मोठ्या प्रमाणात दडपण आणि दहशत असल्याची देखील चर्चा होत आहे.

प्रामाणिकपणे केलेल्या कामाची पावती तेवढीच दर्जेदार स्वरूपाची मिळाली नसल्याची खंत कार्यकर्ते व्यक्त करतात. ज्यांची निवड झाली नाही असे देखील कार्यकर्ते नाराजी व्यक्त करीत आहेत. 15 वर्षापेक्षा जास्त पक्षाचे निष्ठेने काम करून कुठल्याही पदाची अपेक्षा न ठेवता सातत्याने आमदार बाळासाहेब थोरात, डॉक्टर सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्या महत्त्वाच्या निवडणुकांमध्ये तसेच स्थानिक सर्व प्रकारच्या निवडणुकांमध्ये तन-मन-धनाने काम करून देखील आमच्यापेक्षा कामकाजाने ज्युनिअर असणाऱ्या व लायक नसलेल्या काही व्यक्तींना आमच्या बरोबरीची पदे देण्यात आली. महत्त्वाच्या पदांपासून आम्हाला दूर ठेवण्यात आले. अशा देखील प्रतिक्रिया नाराज झालेल्या युवकांमधून ऐकण्यास मिळत आहेत.

पक्षासाठी कोणी किती योगदान दिले याचा कुठलाही लेखाजोखा न पाहता हाजी हाजी करणाऱ्या काही पदविकाऱ्यांना तीच तीच पदे पुन्हा देण्यात आली आहेत. संकट समयी आम्ही आमदार बाळासाहेब थोरात यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलो आहोत. पोलिसांनी, महसूल विभागाने आणि आजूबाजूच्या विरोधकांनी त्रास दिला तरीही आम्ही थोरात आणि पक्षाशी एकनिष्ठ राहिलो. असे असताना देखील पदांच्या वाटपात आम्हाला योग्य स्थान दिले गेले नाही असे मत या नाराज कार्याकडून कार्यकर्त्यांकडून व्यक्त केले जात आहे.

RRAJA VARAT

One thought on “संगमनेर युवक काँग्रेस पदाधिकारी निवडीवरून कार्यकर्त्यांमध्ये नाराजी !”
  1. राजा वराट हे उत्कृष्ट पत्रकार आहेत . निर्भीड लेखन करतात .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!