निळवंडेच्या पाण्याचे चांगले नियोजन होणे गरजेचे — आमदार बाळासाहेब थोरात
थोरात कारखान्याच्या ऊस गळीत हंगामाची सांगता ; १० लाख ८५ हजार मेट्रिक टनाचे विक्रमी गाळप
प्रतिनिधी —
निळवंडे धरणाच्या कालव्यातून पाणी आल्यामुळे काही प्रमाणात मदत झाली आहे. मात्र या पाण्याचे नियोजन चांगले होणे गरजेचे आहे. या पाण्यापासून कोणीही वंचित राहणार नाही यासाठी आगामी काळात काम करावे लागणार असल्याचे प्रतिपादन आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. दुष्काळी परिस्थितीतही थोरात सहकारी साखर कारखान्याने 10 लाख 85 हजार मेट्रिक टनाचे विक्रमी गाळप केले असल्याचेही त्यांनी सांगितले.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन 2023 – 24 या गळीत हंगामाच्या सांगता समारंभ प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर कांचनताई थोरात, डॉ. जयश्री थोरात, रणजीतसिंह देशमुख, संतोष हासे, हिरालाल पगडाल, इंद्रजीत थोरात, हौशीराम सोनवणे, गणेश कारखान्याचे व्हा. चेअरमन विजय दंडवते, विक्रांत दंडवते, अर्चना बालोडे, अविनाश सोनवणे, ॲड.रामदास शेजुळ, मीरा शेटे, निर्मला राऊत आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

कारखान्याच्या कार्यक्षेत्रात 10 लाख मेट्रिक टन ऊस निर्मिती केल्याने उत्पादन खर्च कमी होऊन अर्थव्यवस्था चांगली होईल. डेव्हलपमेंट विभाग व ऊस उत्पादक यांनी एकरी जास्तीत जास्त उत्पादन वाढवण्यासाठी भर द्यावा असे आवाहन करतानाच आमदार थोरात म्हणाले की, चालू वर्षे हे दुष्काळाचे वर्ष आहे या परिस्थितीतही कारखान्याने दहा लाख 85 हजार मेट्रिक टनाचे विक्रमी गाळप केले आहे. यापुढील काळात कार्यक्षेत्रात 10 लाख मेट्रिक टन ऊस उत्पादन होणे गरजेचे आहे याचबरोबर एकरी जास्तीत जास्त उत्पादन होण्याकरता सर्व शेतकरी बांधव व कारखान्याच्या डेव्हलपमेंट विभागाने काम करावे. यामुळे उत्पादन खर्च कमी होऊन कारखान्याची अर्थव्यवस्था चांगली झाल्याने शेतकऱ्यांना अधिक चांगला भाव देता येईल.

सहकारी उद्योगांमध्ये अनेक निर्बंध असतात तसे निर्बंध खाजगीकरणात नाहीत. सरकारने साखर, कांदा ग्राहकांना स्वस्त दराने द्यावा. मात्र शेतकऱ्यांना मारून नको. तर अनुदानाच्या रूपाने द्यावा. शेतकरी हा कायम अडचणीत असून त्याला सरकारने मदत केलीच पाहिजे.
तर कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर म्हणाले की, दुष्काळी परिस्थिती ही न डगमगता कारखान्याने चांगले गाळप करताना वीज निर्मितीसह अमृत शक्ती खत व इतर उपपदार्थांची निर्मिती केली असल्याचेही ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केली तर व्हा. चेअरमन संतोष हासे यांनी आभार मानले. यावेळी कार्यक्षेत्र व कार्यक्षेत्र बाहेरील शेतकरी ऊस उत्पादक अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
