महिलांच्या उत्कर्षासाठी ‘लखपती दीदी’ योजना — शालिनीताई विखे पाटील
जनसेवा फौंडेशनच्या माध्यमातून ४० हजार महिलांच्या बचत गटांचे संघटन
प्रतिनिधी —
जनसेवा फौंडेशनच्या माध्यमातून ४० हजार महिलांच्या बचत गटांचे संघटन तयार झाले आहे. महिलांच्या उत्कर्षा करीता ही चळवळ महत्वपूर्ण ठरली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आता लखपती दीदी योजना सुरु झाल्याने या चळवळीला अधिक स्थैर्य प्राप्त होईल असा विश्वास जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांनी व्यक्त केला.

संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथे माधवनगर मध्ये बचत गटातील महिलांनी आयोजित केलेल्या हळदी कुंकू समारंभ तसेच गाव चलो अभियानाच्या माध्यमातून सौ.विखे पाटील यांनी महिलांशी संवाद साधला. निषा भरितकर यांच्या अध्यक्षतेखली झालेल्या कार्यक्रमास भाजपाच्या जिल्हाध्यक्षा कांचनताई मांढरे, तालुका अध्यक्षा कविता पाटील, सुनिता कानवडे, सुनिता राहाणे, जयश्री पवार, आशा कोतवाल, अलका बोरगे आदिंसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

विखे पाटील म्हणाल्या की, जनसेवा फौंडेशनच्या माध्यमातून विविध उपक्रम सुरु आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन दिली जात आहे. फुलांपासून अगरबत्ती तयार करण्याचा उपक्रम हा देशातील एक प्रयोगशिल उपक्रम ठरला आहे. सेंद्रीय सॅनीटरी पॅड तसेच वृत्तपत्राच्या कागदापासून पेन्सिल बनविण्याचा उपक्रमही हा नाविन्यपुर्ण ठरला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टाकाऊ पासून टिकाऊ हा संदेश आपल्या सर्वांना दिला. त्याचे अनुकरण जनसेवा फौंडेशनने प्राधाण्याने केले आहे. बचत गटांची चळवळ ही महिलांच्या उत्कर्षासाठी महत्वपूर्ण ठरलीच, या माध्यमातून अनेक छोटे उद्योग सुरु झाले. केंद्र सरकारनेही आता बचत गटाच्या चळवळीला अधिक पाठबळ देण्याचे निर्णय घेतले आहेत. लखपती दीदी हा केंद्र सरकारचा निर्णय हा या चळवळीला अधिक स्थैर्य देणारा ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी सुनिता सहाणे, भाजपाचे शहर अध्यक्ष श्रीराम गणपुले यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास ज्ञानदेव सहाणे, डॉ.सोमनाथ कानवडे, राहुल भोईर, दादा गुंजाळ यांच्यासह पदाधिकारी कार्यक्रम मोठ्या संख्येने उपस्थित होते. तालुक्यातील कौठे धांदरफळ येथेही विखे पाटील यांच्या उपस्थितीत गाव चलो अभियानाचा प्रारंभ करण्यात आला.

माधवनगर परिसरात बहुसंख्येने मालपाणी उद्योग समुहातील कामगार राहातात. यासर्व कामगारांना कारखान्यात जाण्यासाठी रस्त्याचा मोठा प्रश्न असल्याची बाब गांभिर्याने घेवून यासाठी म्हाळुंगी नदीवरील छोट्या पुलाच्या कामाचा प्रस्ताव तातडीने तयार करुन, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन देण्याची ग्वाही विखे पाटील यांनी दिली.
