संगमनेर शहरातील गटारींचे पाणी म्हाळूंगी नदी पात्रात सोडणे थांबवा !
कृती समितीची मागणी
प्रतिनिधी —
संगमनेर शहरातून वाहणाऱ्या प्रवरा आणि म्हाळूंगी नदीतील मुख्य प्रवाहात गावातले आणि ग्रामीण भागातले सांडपाणी मिश्रित होत असल्याने शहरातील हद्दीतून जाणाऱ्या म्हाळूंगी नदी पात्राची गटारगंगा झाली असल्याची तीव्र प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे. ढोलेवाडी पूल ते प्रवरा आणि म्हाळूंगी नदीच्या संगमापर्यंत म्हाळूंगी नदीच्या पात्रात संपूर्ण गटारीचे पाणी सोडल्यामुळे नदीचे पात्र एका बाजूने पूर्णपणे गटारीयुक्त झाले असून नागरिकांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

संपूर्ण शहरातील गटार योजनेसाठी भूमिगत गटार बांधण्याचा कार्यक्रम नगरपालिकेने हाती घेतलेला आहे. मात्र त्यासाठी लागणाऱ्या एसटीपी प्लांट वरून ग्रामस्थ, शहरातील नागरिक आणि नगरपालिकेच्या प्रशासनात वाद, उपोषण, आंदोलने झाल्याने एसटीपी प्लांट चे काम थांबलेले आहे.

शहरातून आणि उपनगरातून वाहणाऱ्या सर्व गटारी एकत्रितपणे प्रवरा नदी आणि म्हाळूंगी नदी पात्रात सोडण्यात आल्या आहेत. ढोलेवाडी परिसरातील पुलापासून ते नदीच्या संगमा पर्यंत सर्वत्र गटारीचे पाणी पसरलेले आहे. त्यामुळे या परिसरात दुर्गंधी नेहमीच पसरलेली असते.

सध्या म्हाळूंगी नदीवर फुलाचे काम सुरू आहे. या गटारीच्या दुर्गंधीमुळे नागरिकांना त्रास होत आहेत. उन्हाळ्यात हा त्रास अधिक वाढतो. त्यामुळे या गटारी वाहून नेण्यासाठी नगरपालिकेने कायमस्वरूपी बंदिस्त पर्यायी योजना करावी अशी मागणी म्हाळुंगी पुल बनवा समितीचे सुकाणु समितीचे किरण पाटणकर व सहकारी यांनी केली. तसेच मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना सर्व परिस्थिती समजावून सांगितली असून लवकरात लवकर कार्यवाही करावी अशी विनंती केली आहे.

