तेराशे विद्यार्थी आणि रांगोळी..
जन्मशताब्दी निमित्त सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांना अनोखी मानवंदना !
प्रतिनिधी —
सह्याद्री शिक्षण संस्थेच्या वडगाव पान येथील डी.के. मोरे जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या १ हजार ३८५ विद्यार्थ्यांनी अनोखी बैठक करून अमृत उद्योग समूहाचे संस्थापक थोर स्वातंत्र्य सेनानी यांच्या जन्मशताब्दीचा लोगो साकारला असून या विद्यार्थ्यांनी शंभर अंकांमध्ये स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब थोरात यांना मानवंदना दिली आहे.

वडगाव पान येथील डि.के. मोरे जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मैदानावर या शाळेतील १३८५ विद्यार्थ्यांनी क्रीडा शिक्षक बाळासाहेब कांडेकर व कलाशिक्षक सत्यानंद कसाब यांच्या संकल्पनेतून ही जन्मशताब्दीची प्रतिकृती साकारली. थोर स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब थोरात यांचे हे जन्मशताब्दी वर्ष असून यानिमित्त तालुक्यात विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. सह्याद्री विद्यालयाने सांस्कृतिक कार्यक्रमांमधून सहभाग नोंदवत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिला आहे. याच उपक्रमांतर्गत जनता विद्यालयात इयत्ता पाचवी ते बारावी मधील विद्यार्थ्यांनी मैदानावर अनोखी बैठक करून संस्थेचे संस्थापक सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जन्मशताब्दी निमित्त १०० हा मानवी प्रतिकृतीचा अभिनव लोगो साकारला आहे. यामध्ये एक सूर एक ताल करत विद्यार्थ्यांनी विविध कला व क्रीडा उपक्रम सादर केले. अभिनव रांगोळी पाहण्याकरता पंचक्रोशीतून अनेक विद्यार्थी व पालकांनी मोठी गर्दी केली होती.

या जन्मशताब्दी रांगोळी साकारण्याच्या वेळी थोरात सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ, प्राचार्य साहेबराव कोल्हे, उपमुख्याध्यापिका लता पवार, ज्युनिअर कॉलेजचे इन्चार्ज प्रा. बाबा गायकवाड, क्रीडाशिक्षक प्रा. भीमराज काकड, उपस्थित होते. यापूर्वीही रांगोळी प्रकल्पामधून क्रीडा शिक्षक बाळासाहेब कांडेकर व कलाशिक्षक सत्यानंद कसाब यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी काढलेल्या मानवी रांगोळ्यांचे राज्यभर कौतुक झाले. जयंती महोत्सव निमित्त या शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले आहे.

या अभिनव उपक्रमाचे आमदार बाळासाहेब थोरात, संस्थेचे चेअरमन माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, दुर्गाताई तांबे, लक्ष्मणराव कुटे, इंद्रजीत थोरात, डॉ. जयश्री थोरात, बाबुराव गवांदे, दत्तात्रय चासकर, आदींसह विविध पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

