घर तळ जमिनी हक्क परिषद समशेरपूर येथे संपन्न

प्रतिनिधी —

घरांच्या तळ जमिनीचे हक्क श्रमिकांना बहाल कराव्यात या मागणीसाठी अकोले तालुक्यातील समशेरपूर येथे भव्य ‘घर तळ जमीन हक्क परिषद’ उत्साहात संपन्न झाली. समशेरपूर येथील बहुउद्देशीय कार्यालयात संपन्न झालेल्या या परिषदेसाठी तालुकाभरातून मोठ्या संख्येने श्रमिक उपस्थित होते. घरे नावावर आहेत मात्र तळ जमिनी सरकारच्या नावे आहेत अशी घरे अतिक्रमणे म्हणून गणली जातात. अशी अतिक्रमणे निष्कासित करण्याची कारवाई केली जाते अशा परिस्थितीत श्रमिकांना बेघर होण्याची वेळ येते. किसान सभेने अशा श्रमिकांची संघटना उभी केली असून या तळ जमिनी घरात रहात असलेल्या श्रमिकांच्या नावे व्हाव्यात यासाठी संघर्ष सुरु केला आहे. तळ जमिनी नावे करण्याच्या संघर्षाला ठोस वैचारिक दिशा देण्यासाठी समशेरपूर येथे परिषदेचे आयोजन करण्यात आले. होते. डॉ. अजित नवले यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व डॉ. भाऊराव उघडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या परिषदेचे संचलन समशेरपूरचे लोकनियुक्त सरपंच व माकपचे तालुका सचिव कॉ. एकनाथ मेंगाळ यांनी केले होते.

सरकारी जमिनीवरील घर व शेत जमिनींसाठीची अतिक्रमणे निष्कासित करण्याचे आदेश दिनांक १५ नोव्हेंबर २०२२ रोजी व ६ ऑक्टोबर २०२२ रोजी मा. उच्च न्यायालयाने दिले होते. यानुसार ३ डिसेंबर २०२२ रोजी निवासी उपजिल्हाधिकारी, अहमदनगर यांनी अशी अतिक्रमाणे निष्कासित करण्याबाबतचे आदेश निर्गमित केले होते. मात्र याबाबत राज्यभर प्रश्न उपस्थित झाल्याने राज्य सरकारने घरांसाठीचे अतिक्रमणे नियमनाकुल करण्याबाबत निर्णय घेतला. १ डिसेंबर २०२२ रोजी काढलेल्या परिपत्रकात याबाबतचे निर्देश देण्यात आले. दिनांक २० ऑक्टोबर २०२२ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीचा हवाला देऊन काढण्यात आलेल्या परिपत्रकात घरांच्या तळ जमिनी श्रमिकांच्या नावे करण्याबाबत निर्देश देण्यात आले. ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत गावठाण व गावठाणा बाहेरील घरांसाठी झालेली अतिक्रमणे नियमिक करून ती संबंधितांच्या नावे करण्याबाबत आदेश देण्यात आले. मात्र या आदेशाला वर्ष पूर्ण होत आले असले तरी अद्यापही या आदेशाची अमलबजावणी झाली नाही. किसान सभेने या पार्श्वभूमीवर अकोले तालुक्यात समशेरपूर, टहाकारी, लिंगदेव, देवठाण, आंबड, विठे, बहिरवाडी, पानसरवाडी या गावांमधून ८५० प्रकरणे अकोले तहसील कार्यालयात जमा केली. तहसील कार्यालया समोर २८ ते ३० ऑक्टोबर २०२३ रोजी धरणे धरून याचा पाठपुरावा केला. प्रशासनाने या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्वच गावांचे असे सर्वे करून घरांच्या तळ जमिनी नावे कराव्यात असा ठराव या परिषदेत करण्यात आले.

तळ जमिनी नावे नसणाऱ्या श्रमिकांची संघटना बांधण्यात अहोरात्र मेहनत घेणाऱ्या कॉ. सदाशिव साबळे यांनी या परिषदेचा मुख्य ठराव मांडला. कॉ. नामदेव भांगरे यांनी किसान सभेच्या वतीने परिषदेला संबोधित केले. परिषदेसाठी समशेरपूर गावाचे माजी सरपंच पोपट दराडे, अगस्ती कारखान्याचे संचालक सचिन दराडे, किसान सभेचे राजाराम गंभिरे, भीमा मुठे, तुळशीराम कातोरे, शंकर चोखंडे, योगेश भरीतकर, खंडू मेंगाळ, गणपत आगिवले, गोरख आगिवले, मारुती मंडलिक, दामू गीऱ्हे, तुकाराम मेंगाळ, देवराम उघडे, लताबाई भांगरे, नामदेव पिंपळे आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!