बाजारात तुरी आणि…
माळुंगी नदीवरील पुलाला स्वर्गीय खासदार बाळासाहेब विखे पाटील यांचे नाव द्यावे – संगमनेर भाजपची मागणी
काँग्रेस – भाजपमध्ये कलगीतुरा सुरू !!
पूलाचा निधी अडवणारे भाजपवाले श्रेयासाठी खोट्या बातम्या पसरवत आहेत – संगमनेर युवक काँग्रेसचा आरोप
प्रतिनिधी —
संगमनेर शहरातील माळुंगी नदीवरील नव्याने होणारा पूल आणि त्या भोवतीचे राजकारण सर्वश्रुत आहे. आता पुन्हा या पुलाच्या निधीवरून काँग्रेस आणि भाजपमध्ये राजकीय कलगीतुरा सुरू झाला आहे.

संगमनेर भाजपने पत्रकार परिषद घेऊन सदर पुलाचा निधी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नामुळेच मिळाला आहे. तर यापूर्वीही स्वर्गीय खासदार बाळासाहेब विखे पाटील यांनी सुद्धा पूलासाठी निधी दिलेला आहे. त्यामुळे या पुलाला विखे पाटील यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी ॲड. श्रीराम गणपुले जावेद जहागीरदार आणि अमोल खताळ या पदाधिकाऱ्यांनी केली आणि या पुलासाठी कोणतेही योगदान न देणाऱ्या लोकांनी निधीसाठी काय केले हे कागदपत्रासह सिद्ध करावे असे आव्हान पत्रकार परिषदेत दिले.

त्याला उत्तर म्हणून लगेच काँग्रेस पक्षाकडून पत्रक काढण्यात आले असून युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष निखिल पापडेजा यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, नदीवरील पुलासाठी निधी हा आमदार बाळासाहेब थोरात यांनीच आणला आहे आणि तेच तो पूल पूर्ण करतील. निधी अडवणारे भाजपवाले खोट्या बातम्या पसरवत आहेत. खरी वस्तुस्थिती जनतेला माहित आहे.

दोन्ही बाजूने पत्रकबाजी सुरू झाल्याने संगमनेर करांना पुन्हा माळुंगी नदीवरील पूल हा राजकीय करमणुकीचा विषय झाला आहे. या पत्रकबाजी मध्ये पुलाचे काम दुर्लक्षित होऊ नये हा महत्त्वाचा मुद्दा आहे. पूल होण्याआधी श्रेय वादाची लढाई जुंपली आहे. हा प्रकार म्हणजे बाजारात तुरी आणि… असा झाला आहे..

