महसूल मंत्री विखेंच्या मतदारसंघात आणि आमदार थोरात यांच्या स्वीय सहाय्यकाच्या शेतात सापडल्या ‘पेट्या’ !
ग्रामस्थ, हिंगे यांच्यासह तलाठी व अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल
राज्यात खोके तालुक्यात पेट्या… चर्चाच चर्चा !!
प्रतिनिधी —
गेल्या दोन वर्षापासून राज्यात खोक्यांची चर्चा ऐरणीवर उकळत आहे. या चर्चेच्या पाठोपाठ आता संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक या गावात म्हणजेच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शिर्डी विधानसभा मतदारसंघात आणि आमदार बाळासाहेब थोरात यांचे स्वीय सहाय्यक विजय हिंगे यांच्या शेतात काही ‘पेट्या’ सापडल्याने एकच खळबळ उडाली असून या पेट्यांची तालुक्यात चर्चा आहे. पेट्यांवरून राजकारण चांगलेच तापले असून आरोप प्रत्यारोपच्या फैरी झडत आहेत. मात्र या पेट्या बांधकाम कामगारांच्या संरक्षणासाठी देण्यात येणाऱ्या साहित्याच्या पेट्या आहेत. आश्वी बुद्रुक आणि संगमनेर व शिर्डी विधानसभेत या पेट्यांवरून राजकारण चांगलेच पेटले आहे.

एकमेकांविरुद्ध फिर्यादी दिल्याने कामगार आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांसह तलाठ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. तर विजय हिंगे आणि काही ग्रामस्थांवर देखील सरकारी कामात अडथळा आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीची पार्श्वभूमी असलेल्या या प्रकारामुळे आश्वी बुद्रुकचा परिसर आणि पंचक्रोशी ढवळून निघाली आहे. विजय हिंगे यांच्या पत्नी ग्रामपंचायतची निवडणूक लढवीत होत्या. त्यावेळी मतदारांना आमीष दाखवण्यासाठी नोंदणीकृत बांधकाम कामगारांना मिळालेल्या साहित्य संचाच्या पेट्या पत्नीला निवडून आणण्यासाठी संगमनेर तालुक्यातील इतर ठिकाणच्या बांधकाम मजुरांच्या मंजूर साहित्यांचा साठा घराजवळील गोठ्यात अनधिकृत पणे लपवून ठेवल्या. निवडणुकीच्या काळात ही बातमी पसरतात सदर साठा शेजारील चिंचपूर गावात जवळचे नातेवाईक रामनाथ सहादू तांबे यांच्या घरी लपवून ठेवण्यात आल्या. त्यामुळे सदर प्रकरण गंभीर असून या प्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधितांवर कारवाई कडक कारवाई करावी अशी मागणी आश्वी येथील हरी दत्तू ताजने यांनी सहाय्यक कामगार आयुक्त अहमदनगर यांच्याकडे केली होती.

सहाय्यक कामगार आयुक्त यांनी तातडीने या तक्रारीची दखल घेत सरकारी कामगार अधिकारी तु. गो. बोरसे आणि दुकान निरीक्षक ल. प्र. दाभाडे यांना या तक्रारीनुसार आश्वी बुद्रुक तालुका संगमनेर या ठिकाणी जाऊन चौकशी करून तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.

त्यानंतर वरील दोन अधिकाऱ्यांनी तलाठ्यांना घेऊन पंचांसह निमगाव जाळी आश्वी बुद्रुक रोडच्या उजव्या बाजूस उसाच्या शेतात बेवारस स्थितीत इमारत बांधकाम कामगारांना देण्यात येणाऱ्या सुरक्षा संच पेटीचे एकूण दहा नग आढळून आल्याचा पंचनामा केला आहे.

या सर्व प्रकारावरून ‘राजकीय धुरळा’ उडाला आहे. संबंधित अधिकारी आणि तलाठ्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. ही तक्रार श्रीमती कमल जगन्नाथ हिंगे (वय ६५) यांनी दिली आहे. त्यांच्या फिर्यादी वरून पोलिसांनी तुषार गोपाळ बोरसे, ललित प्रकाश दाभाडे, मच्छिंद्र रहाणे (तलाठी चिंचपुर) आणि धोंडीबा बालचिम (तलाठी आश्वी बुद्रुक) यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. तर अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सरकारी कामात अडथळा आणला म्हणून सहा ते सात ग्रामस्थांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच विजय हिंगे यांच्यावर देखील फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

या सर्व प्रकारानंतर ग्रामस्थांनी आक्रमक होत गाव बंद केले. आणि शासकीय अधिकाऱ्यांचा निषेध केला. व यामागे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप करीत पेट्या कोणी आणल्या ? कुठून आल्या ? कशा आल्या ? याचा शोध पंधरा दिवसात घ्यावा अन्यथा आमरण उपोषण करण्यात येणे येईल असा इशारा दिला आहे. विजय हिंगे, बाळासाहेब गायकवाड यांनी आक्रमक होत या प्रकरणी राजकीय नेत्यांना जबाबदार धरले आहे. निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे मुद्दाम हिंगे यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप करण्यात आला. हिंगे यांनी या पेट्याशी आपला कुठलाही संबंध नसल्याचे स्पष्ट सांगितले असून त्या माझ्या शेतात कशा आल्या हे मला माहित नाही. हे एक षडयंत्र आहे असा आरोप केला आहे.

दरम्यान आक्रमक ग्रामस्थांची आश्वी येथे जाऊन आमदार बाळासाहेब थोरात यांनी भेट घेतली असून ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेतले आहे. थोरात यांना ग्रामस्थांनी निवेदन दिले असून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. याबाबत थोरात यांची भूमिका मात्र समजलेली नाही.

