काहीही योगदान नसलेले निळवंडेचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहेत — आमदार बाळासाहेब थोरात यांची घनाघाती टीका
३५ वर्ष आपल्या घरात या विभागाची खासदारकी होती. संगमनेर साठी काय केले हा मोठा प्रश्न आहे.
प्रतिनिधी —
निळवंडे धरणाच्या कालव्यांचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी धरणासाठी व कालव्यांसाठी योगदान देणारे त्या ठिकाणी कोणीही नव्हते. ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांनाही बोलवले नाही. अकोले तालुक्याच्या आमदारांनाही बोलवले नाही. एक प्रकल्पग्रस्त किंवा साधा कामगारही नव्हता. ज्यांनी योगदान दिले ते तिथे नव्हते. आणि ज्यांचे काहीही योगदान नाही ते श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र जनतेला सर्व ज्ञात आहेत. अशी टीका महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव न घेता आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

वडगाव पान येथे पंचक्रोशीच्या वतीने आयोजित कृतज्ञता सोहळा व जलपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर डॉ. सुधीर तांबे, बाबा ओहोळ, दुर्गाताई तांबे, अजय फटांगरे व पंचक्रोशीतील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने प्रत्येक गावात आलेल्या निळवंडेच्या पाण्याचा कलश करून त्याचे पूजन करण्यात आले.

आ. थोरात म्हणाले की, निळवंडे धरणाचे पाणी दुष्काळी जनतेला मिळावे हे स्वप्न ठेवून आपण काम केले. प्रत्येक दिवशी कामात योगदान दिले. पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटनाच्या वेळी योगदान देणारे, प्रकल्पग्रस्त किंवा साधा कामगार ही उपस्थित नव्हता ही चांगली बाब नसून मोठ्या प्रयत्नातून मिळालेल्या निळवंडेच्या पाण्यामुळे तालुक्यात आनंदाची दिवाळी होत आहे. पुढील काळात हे पाणी सर्वांना मिळेल यासाठीच काम केले जाणार असून निळवंडेचे पाणी हा परमेश्वराचा प्रसाद आहे.

आमदार थोरात पुढे म्हणाले की, संघर्षातून समृद्धी निर्माण करणारा संगमनेर तालुका आहे. १९९९ पासून या कामाला आपण सुरुवात केली. दररोज कामाचा आढावा घेतला. आदर्शवत पुनर्वसन केले. धरणग्रस्तांना संगमनेर तालुक्यात जमिनी दिल्या. सहकारी संस्थांमध्ये सन्मानाच्या नोकऱ्या दिल्या. प्रत्येक टप्प्यावर निधी मिळवला. कोरोना संकटातही काम सुरू ठेवले. या सर्व कामात ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांची मदत झाली. ही वेळोवेळी आपण जाहीरपणे सांगितले आहे. उन्हाळ्यामध्ये निळवंडे धरणात दहा टीएमसी पाणी होते

खरे तर त्यावेळी दुष्काळी गावांमधील सर्व बंधारे भरून घेता आले असते. मात्र श्रेयासाठी पाणी सोडणे थांबवले.
आता डाव्या कालव्यातून पाणी सुरू झाले आहे. मात्र फोनाफोनी करून पाणी फोडले जात आहे. अनेक गावांना वंचित ठेवले जात आहे. अशी दडपशाही व दहशतीचे राजकारण संगमनेर तालुक्यात खपवून घेतले जाणार नाही.

तुम्ही इकडे येतात ते तालुक्यातील विकास कामे थांबवण्यासाठी. दहशत निर्माण करण्यासाठी आम्ही राहता तालुक्यात जातो ते चांगले करण्यासाठी. ३५ वर्ष आपल्या घरातही या विभागाची खासदारकी होती. संगमनेर साठी काय केले हा मोठा प्रश्न आहे.

नगर- मनमाड रस्ता का होत नाही, कोल्हार चा पूल तसाच लटकलेला आहे. खरे विकास कामे करण्याची तिकडे गरज आहे.
आम्ही काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिलो. चांगल्या वाईट दिवसातही एकनिष्ठ आहोत. काही लोक संधी साधूपणे पद्धतीने उड्या मारतात. हे जनतेला मान्य नाही. ईडीच्या भीतीने तिकडे गेले कि ते मोकळे राहतात. अत्यंत कमी पाऊस झालेला असताना सत्ताधारी आमदारांच्या तालुक्यात दुष्काळी तालुके म्हणून जाहीर केले . इतर तालुक्यांमध्ये का नाही असा सवाल हे आमदार थोरात यांनी केला.

परंतु हा अस्थिरपणा, असे राजकारण महाराष्ट्राला मान्य नाही. पुढील काळ हा काँग्रेसचाच असणार असून आगामी काळात निळवंडे चे प्राणी प्रत्येक भागाला मिळेल व कोणीही वंचित राहणार नाही यासाठी काम केले जाणार आहे. आपण कधीही कुणाचे वाईट केले नाही. कायम सर्वांना बरोबर घेऊन काम केले. नियतीने आपल्या हातून निळवंडे धरण पूर्ण करून घेतले. दुष्काळी भागात पाणी आले हा स्वप्न दिवस ठरला. ही दिवाळी अत्यंत आनंदाची असून निळवंडे चे पाणी हा परमेश्वराचा प्रसाद असल्याचेही ते म्हणाले.

डॉ. तांबे म्हणाले की, आमदार थोरात यांच्या नेतृत्वामुळे संगमनेर तालुक्यात समृद्धी आली असून निळवंडे धरण व कालवे हे आमदार थोरात यांनी केले इतर लोक श्रेय लाटण्याचा केविलवाणी प्रयत्न करतात.

बाबा ओहोळ म्हणाले की आमदार थोरात यांनी १९८९ मध्ये तालुक्याला हक्काचे पाणी मिळवले. अनेक कष्टातून निळवंडे चे पाणी शेतात आणले. मात्र सत्ताधाऱ्यांची सध्या दडपशाही सुरू आहे. अधिकाऱ्यांवर दबाव टाकला जात आहेत. हे तालुक्यात खपवून घेतले जाणार नाही असे ते म्हणाले. याप्रसंगी दुर्गाताई तांबे, रुपालीताई थोरात, बेबीताई थोरात, रामभाऊ थोरात यांचीही भाषणे झाली.

