धूळ मुक्ती व एस. टी. बस सुविधेसाठी माकप व्यापक आंदोलन उभारणार !
प्रतिनिधी —
शहर व ग्रामीण भागात रस्त्यांची निकृष्ट कामे व पावसाच्या पाण्याचे अयोग्य निस्सरण यामुळे नागरिकांना अनेक आरोग्य समस्यांचा सामना करावा लागतो आहे. तालुक्यातील एस.टी. बस सेवेचाही बोजवारा उडाला असल्याने ग्रामीण व दुर्गम भागांचा शहरांशी संपर्क तुटत चालला आहे. नागरिकांच्या या ज्वलंत प्रश्नांना केंद्रस्थानी आणण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने तालुक्यात आंदोलनाची व्यापक तयारी सुरु केली आहे.

अकोले शहरातील रस्त्यांची कामे अत्यंत निकृष्ट झाल्याने व गटारीचे काम तसेच पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम ठेकेदाराने अपूर्ण ठेवल्याने तालुक्यातील ही महत्वाची बाजारपेठ धुळीने बरबटून गेली आहे. गटारी वर व रस्ता खाली झाल्याने व रस्त्यावरील पावसाचे पाणी गटारीत जाण्यासाठी ठेवण्यात आलेली व्यवस्था बुजविली गेल्याने शहरातील व्यापारी संकुलांमध्ये पाणी शिरण्याचे प्रकारही वाढले आहेत. मागणी करूनही याबाबत तालुक्याचे लोकप्रतिनिधी, नगर पंचायत व सार्वजनिक बांधकाम विभागाने या प्रश्नाकडे पुरेसे लक्ष दिलेले नाही.

तालुक्यातील परिवहन मंडळाच्या बस सेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे. तालुक्यासाठी असलेल्या बसेस अत्यंत निकृष्ट दर्जाच्या असल्याने त्या कोठेही बंद पडतात. बस संख्या व कर्मचारी संख्या कमी असल्याने अनेक गावांमध्ये बसेसची मागणी असूनही बस सेवा सुरु होत नाही. फोफसंडी सारख्या गावाला कोपरे मांडावे मार्गे पुणे जिल्ह्यातून बस सुरु होते मात्र अकोले तालुक्यातून बस जात नाही.

शालेय विद्यार्थ्यानाही पुरेशा बसेस उपलब्ध होत नाहीत. परिवहन मंडळाशी संबंधित हे सारे प्रश्न व खराब रस्ते, धूळ व यामुळे निर्माण होणाऱ्या नागरी समस्यांचे प्रश्न घेऊन माकपच्या वतीने तालुकाव्यापी आंदोलनाचे नियोजन करण्यात येत आहे. तालुक्यातील अकोले, कोतूळ, समशेरपूर, राजूर, गणोरे, खीरविरे व ब्राम्हणवाडा या प्रमुख बाजारपेठांमध्ये पहिल्या टप्प्यात आंदोलने करण्यात येणार असून विभागातील शेतकरी, आदिवासी व श्रमिकांचे प्रश्नही या आंदोलनांमध्ये घेण्यात येणार आहेत. आंदोलनांच्या या टप्प्याची सुरुवात राजूर येथील बेमुदत ठिय्या आंदोलनाने होणार आहे. अशी माहिती
डॉ. अजित नवले, सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, एकनाथ मेंगाळ, ज्ञानेश्वर काकड, गणेश ताजणे, राजाराम गंभिरे, शिवराम लहामटे, संगीता साळवे, जुबेदा मणियार, आराधना बोऱ्हाडे, प्रकाश साबळे, अनिता साबळे, तुळशीराम कातोरे, सोमा मधे, भीमा मुठे यांनी दिली आहे.

