दुधाची दरवाढ आणि कांदा निर्यात बंदी उठवावी — शिवसेनेची मागणी
प्रतिनिधी —
दूध भाव वाढ करावी, कांद्यावरील निर्यात बंदी उठवावी या दोन प्रमुख मागण्यांसाठी संगमनेरमध्ये शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पदाधिकाऱ्यांनी सोमवारी प्रांताधिकार्यांना निवेदन देत आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

राज्य सरकारने दुधाचे भाव १२ ते १३ रुपयांनी कमी केले असल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून दुग्ध व्यवसाय देखील अडचणीत आला आहे. याबरोबरच केंद्र सरकारने कांद्याचे निर्यात बंदी केल्याने कांदा उत्पादक शेतकरी देखील अडचणीत सापडले आहे. निर्यात बंदी केल्याने सर्वत्र कांद्याचे भाव पडले आहेत.

राज्य सरकारने दुधाला प्रति लिटर चाळीस रुपयांचा भाव द्यावा तसेच कांद्यावर केंद्र सरकारने लादलेली निर्यात बंदी मागे घ्यावी यासाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी संगमनेरचे प्रांताधिकारी शैलेंद्र हिंगे यांना निवेदन देत या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

शिवसेना सह संपर्कप्रमुख ॲड. दिलीप साळगट, उपजिल्हाप्रमुख अशोक सातपुते, विधानसभा संघटक कैलास वाकचौरे, शहर प्रमुख अप्पा केसेकर, तालुकाप्रमुख संजय फड, शहर संघटक पप्पू कानकाटे, योगेश बिचकर, भैय्या तांबोळी, भीमाशंकर पावसे, समीर ओझा, अनिल गांगवे, पाटील भाऊ कुदनर, किरण खंडागळे आदिसह शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.

