हिरडा व दुधाला रास्त भाव मागणीसाठी अकोले तहसील कार्यालयावर किसान सभेचा भव्य मोर्चा !
तहसील कार्यालयासमोर दूध ओतून दूध दर वाढविण्याबाबत सरकार करत असलेल्या दिरंगाईचा धिक्कार करण्यात आला
प्रतिनिधी —
हिरडा आणि दुधाला रास्त भाव मिळावा या मागणीसाठी किसान सभेच्या वतीने अकोले तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये आदिवासी महिला बांधव शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

हिरडयाची सरकारी खरेदी करण्याची मागणी मान्य करण्यात आली असून यासाठी आवश्यक आलेल्या 106 पेसा गावांचे ठराव आंदोलकांना गेल्या तीन दिवस सुरू आलेल्या ठिय्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्राप्त करून देण्यात आले.

राहत्या घरांच्या तळ जमिनी शेतकऱ्यांच्या नावे करण्यासाठी केलेली प्रकरणे 20 डिसेंबर पर्यंत तपासण्यात येतील असे यावेळी प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. हिरडा झाडांची नोंद शेतमालकाच्या नावे व्हावी ही मागणीही यावेळी मान्य करण्यात आली.

अकोले शहरातून यावेळी मोर्चा काढण्यात आला. सरकारच्या जनता विरोधी धोरणांचा निषेध करणाऱ्या घोषणा देण्यात आल्या. तहसील कार्यालयावर निदर्शने करून सभा घेण्यात आली.
डॉ. अजित नवले, सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, एकनाथ मेंगाळ, राजाराम गंभीरे, भीमा मुठे, शिवराम लहामटे, तुळशीराम कातोरे आदींनी मोर्चाचे नेतृत्व केले.

