पुणे नाशिक महामार्गावर घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत रस्ता लूट करणारे आरोपी नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने पकडले !
दोघेजण ताब्यात, एक जण फरार ; ५ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
प्रतिनिधी —
पुणे नाशिक महामार्गावर पठार भागात घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत रस्ता लूट करणाऱ्या आरोपींना नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. यामध्ये तीन आरोपी सापडले असून दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तर एक जण फरार झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

संजय सुदाम मोरे (वय २३, रा. रामवाडी, संवत्सर,ता. कोपरगाव) आशिष उर्फ काल्या राममिलन कोहरी (रा. पुणतांबा चौफुली, कोकमठाण, ता. कोपरगाव) आणि करण सुदाम मोरे (राहणार रामवाडी, संवत्सर, ता. कोपरगाव) यापैकी दोघांना ताब्यात घेतल्या असून करण मोरे हा फरार झाला आहे.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, काही दिवसांपूर्वी राजकुमार श्रीरंग भालके हे आपल्या ॲपे रिक्षा मधून पुणे नाशिक महामार्गावरून जात असताना कर्जुले पठार गावाच्या शिवारात काळभैरवनाथ मंगल कार्यालयाच्या समोर त्यांच्या गाडीचा पाठलाग करून इर्टिगा कार त्यांच्या ॲपे रिक्षाला आडवी घालून कोयत्याने रिक्षाचा काचा फोडीत व त्यांना मारहाण करीत रिक्षातून १ लाख ३५ हजार रुपये घेऊन आरोपींनी पोबारा केला होता त्यानंतर घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत तपास करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानंतर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी गुन्हे शाखेच्या पथकाला सूचना देऊन कारवाई करण्यास सांगितले असता पोलीस पथकांनी गुन्ह्याच्या ठिकाणी भेट देऊन नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्ग लगत असलेल्या हॉटेल, ढाबे, टोलनाके यावरील सीसीटीव्हीचे फुटेज चेक करून आरोपींची माहिती काढली.

त्यादरम्यान पोलीस निरीक्षक आहेर यांना गुप्त बातमीदार मार्फत खबर मिळाले की, संजय सुदाम मोरे (रा. कोपरगाव) याने व त्याच्या साथीदाराने सदरचा गुन्हा केला आहे. माहितीची खात्री करून घेतल्यानंतर पथकाने आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली.

कोपरगाव येथून संजय सुदाम मोरे (वय २३, रा. रामवाडी, संवत्सर,ता. कोपरगाव) याला शोधून काढले आणि त्याच्याकडून माहिती घेतली असता त्याचे साथीदार आशिष उर्फ कालिया राममिलन कोहरी (रा. पुणतांबा चौफुली, कोकमठाण, ता. कोपरगाव) आणि करण सुदाम मोरे (राहणार रामवाडी, संवत्सर, ता. कोपरगाव) यांची माहिती मिळाली.

पोलिसांनी संजय मोरे आणि आशिष उर्फ काल्या कोहरी याला ताब्यात घेतले मात्र करण सुदाम मोरे हा पळून जाण्यात यशस्वी झाला. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली गाडी क्रमांक एमएच ०६ बीएम २३३९ तसेच रोख रक्कम असा एकूण ५ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
वरील कारवाईच्या पथकामध्ये पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे पोलीस हवालदार विजय वेठेकर, अतुल लोटके, पोलीस नाईक रवींद्र कर्डिले, संतोष खैरे, फुरकान शेख, पोलीस कॉन्स्टेबल रणजीत जाधव, रोहित येमुल, किशोर शिरसाठ, सागर ससाणे, अमोल कोतकर अमृत आढाव, यांनी सहभाग घेतला होता.

