कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यात जनजागृती अभियान !

संगमनेर महाविद्यालयाचा वन्यजीव सप्ताह उपक्रम 

प्रतिनिधी —

संगमनेर महाविद्यालयातील वसुंधरा ग्रीन क्लब, राष्ट्रीय सेवा योजना व नाशिक वन्यजीव विभागांतर्गत असलेल्या कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यातील शेंडी वन्यजीव परिक्षेत्र यांच्या संयुक्त विद्यमाने वन्यजीव सप्ताहनिमित्ताने कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य परिसरात जनजागृती अभियान संपन्न झाले.

माणूस निसर्गात केवळ एक ग्राहक आहे, उत्पादक नाही. त्यामुळे  मानव मुलभूत गरजासाठी  निसर्गावर पूर्णपणे अवलंबून आहे. त्यामुळे वनसंपदेचे, वन्यजीवांचे, पर्यायाने निसर्गाचे रक्षण आणि जतन करणे आवश्यक आहे. देशाच्या समृद्धतेमध्ये वन्यजीवांचे अतिशय महत्त्व आहे. अनेक वैशिष्ट्यपूर्ण वन्यप्राण्यांचे सुरक्षित वस्तीस्थान बनण्यासाठी भारतामध्ये अतिशय पोषक वातावरण आहे.

पर्यावरण, अर्थव्यवस्था आणि संस्कृती यातही वन्यजीव महत्त्वाची भूमिका बजावत असतात. अलीकडे मानव आणि वन्यजीवांमध्ये जगण्यातून संघर्ष निर्माण झाला आहे. यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत असल्याने वन्यजीवांचा अधिवास धोक्यात आला आहे. त्यामुळे हे निसर्गचक्र, निसर्गसौंदर्य आणि वैविध्यता  कायम राखण्याकरिता वन्यजीव सप्ताहनिमित्ताने मानवाने त्यांच्या संरक्षणाकरीता हातभार लावण्याची गरज आहे. संगमनेर महाविद्यालायचे वसुंधरा ग्रीन क्लब व राष्ट्रीय सेवा योजना यामध्ये सक्रिय कार्य करत आहे,  असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांनी केले.

शेंडी वनपरिक्षेत्राचे अधिकारी अमोल आडे यांनी वन्यजीव सप्ताहाचे महत्त्व विशद केले. जनतेला वन्यजीव संरक्षण आणि संरक्षणाबाबत अधिक जागरूक करून  वन्यजीवांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करण्यासाठी वन्यजीव सप्ताहाची गरज आहे. वन्यजीव संरक्षणासाठी भागीदारी ही संकल्पना घेवून या वर्षी वन्य जीव सप्ताह साजरा करण्यात येत आहे.

संगमनेर महाविद्यालयातील वसुंधरा ग्रीन क्लब व राष्ट्रीय सेवा योजनाचे वन्यजीव सप्ताहामध्ये नेहमीच महत्त्वपूर्ण योगदान असते. संगमनेर महाविद्यालयातील विद्यार्थी वने व वन्यजीव संवर्धनासाठी पुढाकार घेवून  समाजपयोगी कार्य करत आहे. पथनाट्याद्वारे मानव वन्यजीव संघर्ष, वने व वन्यजीव संवर्धन, जंगलतोड, वणवे, गडसंवर्धन व स्वच्छता, जलसंवर्धन, पाणी गळती, पाणी बचत, कचरा व्यवस्थापन, जैवविविधता, जंगलाला लागणारे वणवे, प्लॅस्टिक मुक्त जंगल  इ. बाबत  जनजागृती मोहिम उत्कृष्टपणे राबविली.

या जनजागृती अभियानांतर्गत शेंडी बाजारातळ, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, मुतखेल, रतनवाडी परिसरात पथनाट्याचे सादरीकरण केले. लायन्स क्लब सफायर, संगमनेर यांनी या अभियानासाठी सहकार्य लाभले. या अभियानाच्या यशस्वीमध्ये वसुंधरा ग्रीन क्लबचे अध्यक्ष ईश्वर डुबे, उपाध्यक्ष ईश्वरी आगलावे, पल्लवी बढे, कार्यक्रम समन्वयक प्रज्वल गोर्डे या पदाधिकाऱ्यांनी व सहभागी विद्यार्थ्यानी  मोलाचे योगदान दिले. या जनजागृतीचे अभियान यशस्वी होण्यासाठी वसुंधरा ग्रीन क्लब समन्वयक प्रा. संदिप देशमुख, प्रा. अमोल कडलग, डॉ. हासे विजाता, प्रा.अब्बास पठाण व अण्णा कांदळकर यांनी सहकार्य व योगदान दिले. या अभियानासाठी वन्यजीव विभागाचे कर्मचारी अधिकारी तसेच प्रा. डॉ. प्रताप फलफले, प्रा.डॉ.सचिन कदम, प्रा.डॉ. वसंत खरात उपस्थित होते.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!