आदिवासी विकास महामंडळ, नाशिक यांच्या कार्यालया समोर…

बाळ हिरड्याच्या रास्त दरासाठी आदिवासींचे बेमुदत धरणे आंदोलन !

प्रतिनिधी —

बाळ हिरड्याची रास्त भावाने सरकारी खरेदी सुरु करावी या मागणीसाठी आदिवासी विकास  महामंडळ, नाशिक यांच्या कार्यालया समोर अखिल भारतीय किसान सभा व आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंच, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती कोम्रेड डॉ. अजित नवले यांनी दिली आहे. सोमवार दिनांक ९-१०-२०२३ दुपारी १२.०० वाजता हे आंदोलन करण्यात येणार आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले व नाशिक जिल्ह्यातील जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांचे हिरडा हे एक महत्वाचे उत्पन्नाचे साधन आहे. आदिवासी शेतकरी जीवावर उदार होऊन हिरडा गोळा करतात. सरकारच्या वतीने जेंव्हा हिरडा खरेदी होतो तेंव्हा स्पर्धा वाढून शेतकऱ्यांना थोडा बरा भाव मिळतो. मात्र जेंव्हा हिरड्याची सरकारी खरेदी  होत नाही तेंव्हा खाजगी व्यापारी संगनमत करून हिरड्याचे भाव पाडतात. आदिवासी शेतकऱ्यांची लुट करतात. किसान सभेने या पार्श्वभूमीवर हिरड्याला रास्त भाव मिळावा यासाठी सरकारने  हिरड्याची खरेदी करावी हि मागणी सातत्याने उचलून धरली आहे.

दिनांक १२ मार्च २०२३ रोजी निघालेल्या दिंडोरी ते वाशिंद लॉंगमार्च मध्ये व दिनांक २७ एप्रिल २०२३ रोजी निघालेल्या अकोले ते लोणी लॉंगमार्चमध्ये किसान सभेने याबाबतची मागणी आक्रमकपणे  उचलून धरली. परिणामी दिनांक ९ मे २०२३ रोजी आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावीत यांना या प्रश्नाबाबत मंत्रालयस्तरावर बैठक घ्यावी लागली. किसान सभेच्या शिष्टमंडळाने या बैठकीत केलेल्या अभ्यासपूर्ण मांडणीमुळे सरकारला बाळ हिरड्याची सरकारी खरेदी करण्याचे आश्वासन द्यावे लागले. मात्र आता पाच महिने होत आले तरी अद्यापही सरकारने याबाबत पुढील कार्यवाही केलेली नाही. किसान सभेने या पार्श्वभूमीवर  पुन्हा आंदोलनाची भूमिका घेतली आहे.

*आंदोलनाच्या प्रमुख मागण्या*

१. हिरडयाला रास्त भाव मिळावा यासाठी बाळ हिरड्याची सरकारी खरेदी सुरु करा.

२. अकोले तालुक्यातील वन धन केंद्रांना मंजुरीची प्रक्रिया पूर्ण करून अनुदान द्या.

३. जुन्नर येथील हिरडा कारखान्याला अनुदान द्या.

वरील मागण्यांसाठी नाशिक आदिवासी आयुक्त कार्यालया समोर होत असलेल्या आंदोलनात हजारोंच्या संख्येने सामील व्हा. शेतकरी श्रमिक एकजूट मजबूत करा. असे आवाहन डॉ. अजित नवले, डॉ, अमोल वाघमारे, नामदेव भांगरे, विश्वनाथ निगळे, एकनाथ मेंगाळ, सदाशिव साबळे, अशोक गिऱ्हे, माधुरी कोरडे, ज्ञानेश्वर काकड, राजू गंभीरे, प्रकाश साबळे, तुळशीराम कातोरे यांनी केले आले आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!