राजुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंदे बंद करण्यासाठी गांधी जयंती पासून आमरण उपोषण !
सामाजिक कार्यकर्ते संतोष मुतडक यांचे प्रशासनाला निवेदन
प्रतिनिधी —
राजुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेले अवैध धंदे बंद करण्याबाबत अनेक वेळा तक्रारी करूनही बंद केले जात नाहीत. म्हणून पोलीस प्रशासन आणि राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या आणि अधिकाऱ्यांच्या निषेधार्थ आणि कारवाईसाठी सामाजिक कार्यकर्ते संतोष मुतडक हे राजुर येथील दत्त मंदिर (अकोले) या ठिकाणी गांधी जयंती दिनापासून २ ऑक्टोबर रोजी आमरण उपोषण करणार आहेत. तसे निवेदन त्यांनी तहसीलदार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर यांना दिले आहे.

राजुर ग्रामपंचायतने संपूर्ण दारूबंदी केलेली असतानाही राजुर पंचक्रोशी आणि पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दारू, मटका अड्डे, गांजा आणि ड्रग्स सहजपणे उपलब्ध होत असून यावर कारवाई करण्याबाबत तक्रारी करूनही कुठलाही उपयोग होत नाही. तसेच ग्रामसभेत अनेकदा ठराव होऊनही राजुर पोलीस व राज्य उत्पादन शुल्क कर्मचारी, अधिकारी हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून अवैध व्यवसायिकांना अभय देतात.

माहिती देऊनही थातूरमातूर कारवाई करणे, व्हाट्सअप वर मेसेज पाठवूनही कारवाई न करणे, असे प्रकार या दोन्ही विभागाकडून होत आहेत. तसेच सध्या गणेशोत्सव व इतर सणासुदीचे दिवस असताना दारू आणि अमली पदार्थांच्या सेवनाने अनुचित प्रकार घडू शकतात. पोलीस प्रशासनाचे कर्तव्य असतानाही नेमके कोणाच्या आशीर्वादाने सदर व्यवसाय सुरू आहेत असा सवालही प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे.

पोलीस आणि संबंधित यंत्रणांनी या संदर्भात कारवाई करणे अपेक्षित असतानाही कोणतेही ठोस कारवाई होत नाही. ही अत्यंत निंदनीय बाब आहे. म्हणून गांधी जयंती २ ऑक्टोबर रोजी राजूर येथे दत्त मंदिरासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा संतोष मुतडक यांनी दिला आहे.

