अमृतवाहिनी बँकेसह संगमनेरच्या सर्व संस्थांचे काम दिशादर्शक — आमदार थोरात
प्रतिनिधी —
सहकारी बँका व पतसंस्था यांना रिझर्व बँकेचे अनेक बंधने आहेत. या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून सातत्याने नागरिक ठेवीदार व सभासदांचा विश्वास आणि गुणवत्ता अमृतवाहिनी बँकेने जपली आहे. डिजिटल उपक्रम राबवताना अमृतवाहिनी बँकेसह संगमनेरच्या सर्व संस्था गुणवत्तापूर्ण कामामुळे राज्यातील सहकारासाठी दिशादर्शक ठरत असल्याचे गौरवउद्गार आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले आहेत.

वसंत लॉन्स येथे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी बँकेच्या ४१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हे बोलत होते. अध्यक्षस्थानी चेअरमन सुधाकर जोशी होते तर व्यासपीठावर दुर्गाताई तांबे, रणजितसिंह देशमुख, इंद्रजीत थोरात, व्हा.चेअरमन ॲड.नानासाहेब शिंदे, संचालक मंडळासह सभासद उपस्थित होते.

आमदार थोरात म्हणाले की, सध्या गणेशोत्सवाचा आनंदाचा काळ सुरू आहे. याच काळामध्ये अमृत उद्योग समूहातील सर्व सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहाने आपण घेत आहोत. राज्यात कुठे नाही अशा सुंदर व मोठ्या संख्येने होणाऱ्या या सर्वसाधारण सभा आहेत. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्त्वावर संगमनेरच्या सर्व सहकारी संस्था वाटचाल करत असल्याने देशातील सहकारासाठी दिशादर्शक ठरल्या आहेत.

रिझर्व बँकेची अनेक बंधने असून अमृतवाहीनी बँकेने अत्यंत गुणवत्ता पूर्ण कामकाज करत वाटचाल सुरू ठेवली आहे. संगमनेर मध्ये सहकारी बँका व पतसंस्थांचे मोठे जाळे असून सुमारे ५ हजार कोटींच्या ठेवी या बँक व पतसंस्थांमध्ये आहेत. ग्रामीण समृद्धी, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था या सर्वांमुळे संगमनेरची बाजारपेठ फुलली आहे. राज्यातील सर्व ब्रँडच्या बँका, पतसंस्था, विविध व्यावसायिक संगमनेर मध्ये आले आहेत. हे संगमनेरच्या आर्थिक समृद्धीचे प्रतीक असल्याचेही ते म्हणाले.

नोटीस वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी अंबादास वाणी यांनी केली. प्रास्ताविक चेअरमन सुधाकर जोशी यांनी केले स्वागत बापूसाहेब गिरी यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले. तर व्हाईस चेअरमन ॲड नानासाहेब शिंदे यांनी आभार मानले. यावेळी सभासद नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अमृतवाहिनी ॲप व डेबिट कार्डचा शुभारंभ
अमृतवाहिनी बँकेने आधुनिक प्रणालीचा वापर करताना रिझर्व बँकेच्या परवानगीने स्वतःचे ॲप विकसित केले असून या ॲपचे व बँकेचे रूपे डेबिट कार्ड याचा शुभारंभ आमदार थोरात यांच्या हस्ते झाला. त्याच वेळी बँकेच्या सर्व सभासदांच्या खात्यावर डिव्हिडंड वर्ग झाल्याचा मेसेज उपस्थित सर्वांसह तालुक्यातील सभासदांना मिळाला.

