संगमनेर शेतकी संघाची ६४ वर्षांची वाटचाल कौतुकास्पद – आमदार बाळासाहेब थोरात
प्रतिनिधी —
राज्यातील अनेक शेतकी संघ मोडकळीस आले असताना संगमनेरचा शेतकी संघ मात्र दिमाखात उभा आहे. खाजगी बरोबर स्पर्धा करतानाही काटकसर व चिकाटी यामुळे शेतकी संघांने जनतेचा मोठा विश्वास संपादन केला असून मागील ६४ वर्षांची वाटचाल ही कौतुकास्पद राहिली असल्याचे गौरवोदगार आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले आहे.

जिल्हा सहकारी बँकेच्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सभागृहात संगमनेर शेतकी सहकारी संघाच्या ६४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी चेअरमन संपतराव डोंगरे हे होते तर व्यासपीठावर माजी आमदार डॉ सुधीर तांबे, व्हाईस चेअरमन सुनील कडलग, संचालक साहेबराव बारवे, किरण नवले, भाऊसाहेब नवले, संतोष नागरे, शिवाजी दिघे, तुकाराम कोठवळ, सचिन दिघे, प्रभाकर सोनवणे, महादू खेमनर, संजय शिरसागर, भास्कर गोपाळे, विनायक काळे, मंगल ठाकरे, प्रभावती ढोकरे, मॅनेजर अनिल थोरात, बी एन काळे आदी उपस्थित होते.

आमदार थोरात म्हणाले की, शेतकी संघाच्या वाटचालीत तीर्थरूप भाऊसाहेब थोरात, स्वर्गीय प्रभाकरराव भोर, बाळासाहेब पा. गुंजाळ, शिवाजीराव थोरात या सर्वांसह विविध पदाधिकाऱ्यांचे मोठे योगदान लाभले आहे.अत्यंत काटकसर व चिकाटीतून या संघाची वाटचाल सुरू असून संघाला खाजगीकरणाची मोठी स्पर्धा आहे. मात्र गुणवत्ता पारदर्शक काम व सचोटी यामुळे ग्राहकांचा मोठा विश्वास शेतकी संघाने निर्माण केला आहे. शेतकी संघाचे गुणवत्तेचे पेट्रोल हे वैशिष्ट्य ठरले आहे. यामुळे येथील पेट्रोलला ग्राहकांची मोठी मागणी असते.

डॉ.तांबे म्हणाले की, केंद्र सरकार हे भांडवलदारांना पूरक काम करत असून शेती व सहकार व्यवसाय मोडीत काढत आहे. खाजगीकरणाला प्राधान्य देत गोरगरिबांच्या जीवनात समृद्धी निर्माण करण्याच्या सहकाराच्या मूळ उद्देशाला हरताळ फासला जात आहे. मात्र हा सहकार टिकवण्यासाठी सर्वांनी कटीबद्ध राहिले पाहिजे असेही ते म्हणाले.

प्रास्ताविक चेअरमन संपतराव डोंगरे यांनी केले. नोटीस वाचन मॅनेजर अनिल थोरात यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर व्हाईस चेअरमन सुनील कडलग यांनी आभार मानले. यावेळी संगमनेर तालुक्यातील विविध सेवा सोसायटीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

