कंत्राटी पद्धतीने नोकर भरती म्हणजे तरुण पिढ्यांचे भवितव्य उध्वस्त करण्याचा घाट
शिक्षक भारती संघटनेचे प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन
प्रतिनिधी —
कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करून अनेक तरुण पिढ्यांचे भवितव्य उध्वस्त करण्याचा घाट सरकारने घातलेला आहे. राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये कंत्राटदार बाह्यसंस्थेच्या माध्यमातून शिक्षकांची पदे भरली जाणार आहेत. त्या विरोधात शिक्षक-शिक्षकेतर संताप व्यक्त करत आहेत. याचा निषेध म्हणून संगमनेर तालुका शिक्षक भारती संघटनेने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले.

शासनाच्या उद्योग विभागाने शासन आदेश काढून राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये शिक्षकांची पदे कंत्राटदारांकडून भरण्याची सक्ती केली आहे. शासनाच्या या निर्णयाला कनिष्ठ महाविद्यालयांबरोबरच प्राथमिक व माध्यमिक शाळांतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कडाडून विरोध केला आहे. आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून संगमनेर तालुका शिक्षक भारती संघटनेने उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांच्या कार्यालयात निवेदन दिले.

खाजगीकरणाचा धोका ओळखून या निर्णया विरोधात सर्वच सरकारी संघटनांनी आंदोलनामध्ये सहभागी व्हायला हवे असे आवाहनही यावेळी करण्यात आले. निवेदन देताना शिक्षक भारती संघटनेचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष प्रा.रामराव काळे, कार्याध्यक्ष डॉ. किशोर डोंगरे, सचिव प्रा.महेश पाडेकर,संगमनेर तालुका अध्यक्ष प्रा. मनोहर राठोड, उपाध्यक्ष प्रा.सुशांत सातपुते व सल्लागार डॉ. मारुती कुसमुडे, प्रा.शिशुपाल वाघमारे आदि उपस्थित होते.

