नरवीर उमाजीराजे नाईक यांची जयंती कळस मध्ये साजरी
प्रतिनिधी —
आद्यक्रांतिवीर उमाजीराजे नाईक यांची जयंती कळस येथे साजरी करण्यात आली. कळस बु॥ येथे ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित कार्यक्रमात नरवीर उमाजी नाईक यांच्या प्रतिमेला सरपंच राजेंद्र गवांदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी जयकिसान दूध संस्थेचे चेअरमन भाऊसाहेब वाकचौरे, छत्रपती युवा प्रतिष्ठानचे सागर वाकचौरे, भाजयुमोचे तालुका उपाध्यक्ष नामदेव निसाळ, रामदास वाकचौरे, शिवसेनेचे रावसाहेब वाकचौरे आदी उपस्थित होते.

सरपंच गवांदे म्हणाले की, भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील आद्यक्रांतिकारक भारतीय स्वातंत्र लढ्यातील सशस्र क्रांतीचे प्रथम जनक उमाजी नाईक मानले जातात. सर्व प्रथम क्रांतीचे स्वप्न पाहणारे महाराष्ट्रातील निधड्या छातीचे वीर उमाजी नाईक नरवीर ठरले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श घेऊन चालणारे उमाजी नाईक यांनी राज्य स्थापन केले होते. स्वतःला राज्यभिषेक केला होता. जर फाशी झाली नसती तर स्वराज्य पुन्हा उभे राहिले असते. व देशावर गुलामगिरी आली नसती.

भाऊसाहेब वाकचौरे म्हणाले की, उमाजी नाईक म्हणजे भारतीय इतिहासातील एक सुवर्णपान आहे. मात्र स्वतंत्र भारतात ते उपेक्षित राहिले. त्यांच्या कार्याचा सरकारने गौरव करावा. रामोशी समाजही आज उपेक्षित जीवन जगत आहे. त्यांना अनुसूचित जमातीच्या सवलती मिळाल्या पाहिजेत. उमाजी नाईक यांचे स्मारक झाले पाहिजे. त्यांच्या नावाने महामंडळ करून रामोशी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. युवकांना कर्ज मिळाले पाहिजे त्यामध्यमातून व्यवसाय करतील. स्वागत संजय सोनवणे यांनी केले. तर आभार माधव वाकचौरे यांनी मानले.

