विद्यार्थ्यांना योगासनांमधून करिअरची संधी — डॉ.संजय मालपाणी

प्रतिनिधी —

जगातील सर्वच क्षेत्रात आज स्पर्धा वाढली आहे, अशावेळी शिक्षणक्षेत्रही त्याला अपवाद राहिलेले नाही. धावपळीच्या जीवनात जगताना शरीरस्वास्थाकडेही तितक्याच गांभीर्याने पाहण्याची गरज असते. विद्यार्थ्यांनी तर लहान वयापासूनच योगासनांची सवय लावली पाहिजे. कारण आपण बुद्धीने कितीही तेज असलो तरीही आपले स्वास्थ उत्तम नसेल तर आपल्यातली पूर्ण क्षमता आपण सिद्ध करु शकत नाही. आतातर केंद्र सरकारने योगासनांचे महत्व लक्षात घेवून त्याला खेळाचा दर्जा दिल्याने विद्यार्थ्यांना त्यातूनही करिअर करण्याची संधी मिळाल्याचे प्रतिपादन गीता परिवाराचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ.संजय मालपाणी यांनी केले.

गीता परिवार व अखिल भारतीय माहेश्‍वरी महिला संघटनच्या संस्कार सिद्धा समितीने राबविलेल्या ‘योगसोपान’ उपक्रमाच्या संकल्पपूर्ती सोहळ्यात ते बोलत होते. या उपक्रमासाठी सहाय्य करणारे पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब गुंड, सुवर्णा फटांगरे, संगमनेर मर्चन्ट्स बँकेचे चेअरमन संतोष करवा, आनंदऋषी पतसंस्थेचे चेअरमन राजकुमार गांधी, शारदा पतसंस्थेचे चेअरमन राजेश लाहोटी, संस्कार सिद्धा समितीच्या अनुराधा मालपाणी आदी उपस्थित होते.

योगासनांचा प्रचार-प्रसार व्हावा व विद्यार्थ्यांना त्याची गोडी लागावी यासाठी बालसंस्कार व योग क्षेत्रात कार्यरत असलेल्या गीता परिवाराने अखिल भारतीय माहेश्‍वरी महिला संघटनच्या संस्कार सिद्धा समितीच्या सहकार्याने देशभरातील दोन हजार शाळांमध्ये योगसोपान उपक्रमाचेे आयोजन करण्याचा संकल्प केला होता. त्यासाठी गेल्या जूनमध्ये शिक्षकांसाठी प्रशिक्षण शिबिरांचेही आयोजन करण्यात आले होते. तालुक्यातील पाचशेहून अधिक शिक्षकांना त्याद्वारे प्रशिक्षण दिले गेले. प्रशिक्षित शिक्षकांनी त्यानंतरच्या पुढील दोन महिन्याच्या कालावधीत सलग २१ दिवस ती आसने विद्यार्थ्यांना शिकवावी असे या उपक्रमाचे स्वरुप होते. स्वातंत्र्यदिनी यासर्व शाळांमधून संगीतमय योगासनांची प्रात्यक्षिके करण्यात आली.

संगमनेर तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील तिनशे शाळांमधील २५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला. त्यातील निवडक सातशे विद्यार्थी आणि तिनशे शिक्षकांच्या उपस्थितीत मालपाणी लॉन्स येथे योगसोपानचा संकल्पपूर्ती सोहळा रंगला होता. यावेळी योगसोपानमधील पहिल्या स्तराच्या सोळा आसनांचे संगितमय प्रात्यक्षिकही सादर करण्यात आले. या उपक्रमात सहभागी विद्यार्थी, शिक्षक व शाळांना प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात आले. देशभरात राबविण्यात आलेल्या या उपक्रमाच्या समन्वयकाची भूमिका दत्ता भांदुर्गे यांनी पार पाडली. योगशिक्षक प्रवीण पाठक, वैष्णव कोरडे व दीपांशु सोलंकी यांनी शाळांशी समन्वय साधला. श्रीकांत कासट, अभिजीत गाडेकर, प्रमोद मेहेत्रे, वैभव कुलकर्णी, भोलेश्‍वर गिरी, अंकित वाघमारे, अनिरुद्ध रहाणे यांनी परिश्रम घेतले. गीता परिवाराचे संगमनेर शाखाध्यक्ष संजय करपे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!