जिल्हा परिषद शाळांचे विद्यार्थीच सक्षम देश घडवतील — अतिरिक्त आयकर आयुक्त भरत आंधळे
वीरगावच्या जि.प.प्रा.शाळेला आयकर विभागाकडून १ लाख ७५ हजारांचा इंटरऍक्टिव्ह पॅनलबोर्ड स्वातंत्र्यदिनी प्रदान-
प्रतिनिधी —
मी स्वतः जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलो. प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षण घेऊन प्रशासकीय सेवेतून देशसेवा घडविणारी पिढी जिल्हा परिषद प्राथमिक शाळांनी निर्माण केली. यापुढे जगालाही हेवा वाटेल असा सक्षम देश जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थीच घडवतील असा आशावाद अतिरिक्त आयकर आयुक्त आणि लेखक भरत आंधळे यांनी व्यक्त केला. राजकारणापायी गाव पेटवून द्या. मात्र गोरगरीबांची पोरं शिकणाऱ्या शाळेत राजकारण करुन त्यांचं नुकसान करु नका अशी अपेक्षा त्यांनी केली.

वीरगाव येथील जि.प.प्राथमिक शाळेत ७७ व्या स्वातंत्र्यदिनाचे ध्वजारोहण भरत आंधळे यांचे हस्ते झाले. स्पर्धा परिक्षा आणि नैतिक मुल्यांच्या शिक्षणाची गरज अधोरेखित करताना ते पुढे म्हणाले, हल्ली मोबाइलमुळे वाचनाचा छंदच विद्यार्थ्यांना राहिला नाही. याला जबाबदार पालक आहेत. आपलेच अनुकरण पाल्य करतो हे भान प्रत्येकाला असावं. पालकच जर भ्रमणध्वनी आणि दुरचित्रवाहिनीसाठी घरात वेळ देत असतील तर मुलेही तेच करतील. त्यामुळे पालकांनीच आता वाचायला सुरुवात करावी. जेणेकरुन पाल्यही त्याच मार्गाने जाईल आणि त्याचा बौध्दिक, मानसिक विकास होऊन जगाचे ज्ञान त्याला प्राप्त होईल. तुमच्या सर्वांगिण विकासाचा एकमेव पाया वाचन ठरेल. त्यामुळे अभ्यास आणि अवांतर वाचनावर लक्ष केंद्रीत करण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

वीरगावच्या जि.प.शाळेला इमारत, शाळा खोल्या, डायनिंग हॉल, व्यायामाचे साहित्य या सर्वांसाठी जवळपास दोन कोटींचा निधी जि.प.सदस्य जालिंदर वाकचौरे यांनी मिळवून दिल्याबद्दल त्यांनी वाकचौरे यांचे कौतुक करुन आभार मानले. जि.प.सदस्य जालिंदर वाकचौरे यांनीही भाषणातून शाळा आणि गावच्या विकासातील योगदानाचा लेखाजोखा मांडला.

स्वातंत्र्यदिनाच्या या कार्यक्रमाला वीरगावकरांची उत्स्फूर्त गर्दी झाली होती. यावेळी जि.प.सदस्य जालिंदर वाकचौरे, अहमदनगर जिल्ह्याचे आयकर विभाग प्रमुख प्रकाश हजारे, मुख्याध्यापक शैला भोईर, विवेकानंद विद्यालयाचे मुख्याध्यापक सुदर्शन ढगे, स्कूल कमेटीचे अध्यक्ष भिमाशंकर मालुंजकर, सरपंच प्रगती वाकचौरे, उपसरपंच जयवंत थोरात, अमृतसागरचे उपाध्यक्ष रावसाहेब वाकचौरे, उदोजीराव थोरात, दिनकर थोरात, नामदेव कुमकर, अंकुश थोरात, विरेंद्र थोरात, बाळासाहेब मुळे, पत्रकार ज्ञानेश्वर खुळे आदींसह सर्व संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

स्वागत भास्कर आंबरे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाऊसाहेब चासकर यांनी तर सुत्रसंचालन रावसाहेब सरोदे यांनी केले. आभार कांचन वाकचौरे यांनी मानले. संभाजी वैद्य, रामनाथ वाकचौरे, सुरेश आरोटे, श्रीराम धराडे, मीनल चासकर, अनिता भालेराव या सर्व शिक्षकांनी कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले. देशभक्तीपर गीतावर विद्यार्थ्यांनी केलेल्या समुहनृत्याने कार्यक्रमाची सांगता झाली.

इंटरऍक्टिव्ह पॅनल बोर्ड आणि डिजिटल क्लासरुम
भारत सरकारच्या आयकर विभागाने १ लाख ७५ हजार रुपयांचा इंटरऍक्टिव्ह पॅनलबोर्ड वीरगावच्या जि.प.शाळेस भेट दिला. विद्यार्थ्यांना डिजिटल क्लासरुममुळे खगोलशास्त्रीय, भौगोलिक संकल्पना सखोलपणे आणि वेगाने समजतील तसेच भौमितिक-गणितीय संकल्पनांचा अभ्यास करण्यासाठीही या क्लासरुमचा वापर होईल. या इंटरऍक्टिव्ह पॅनल बोर्डाचा आणि डिजिटल क्लासरूमचा शुभारंभ अतिरिक्त आयकर आयुक्त भरत आंधळे यांनी केला. विद्यार्थ्यांसाठी आयकर खात्याने दिलेल्या या योगदानाबद्दल समस्त वीरगावकर ग्रामस्थ,विद्यार्थी आणि शिक्षकांनी आयकर खात्याला भरभरुन शुभेच्छा दिल्या.

