गंगामाई घाटावर पुन्हा वाळू तस्करी !

नागरिकांनी वाळूच्या गोण्या जाळल्या

संगमनेरकर सतर्क ; महसूल खाते कधी सतर्क होणार ?

प्रतिनिधी —

 

गंगामाई घाटावर होणारा वाळू तस्करीचा प्रयत्न संगमनेरच्या नागरिकांनी, व्यापारी मित्रांनी पुन्हा हाणून पाडला आहे. जनता आक्रमक झाली आहे. तरी वाळू तस्कर मात्र वाळू चोरी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. महसूल विभाग आता ही बाब किती गांभीर्याने घेतो हे दिसून येईल.

संगमनेर शहरात वाळू तस्करी हा ऐरणी वरचा विषय आहे. तालुक्यात वाळू तस्करांचा धुमाकूळ नेहमीच पाहण्यास मिळतो. शहरातून सोप्या पद्धतीने वाळू तस्करी करण्यास प्रवरा नदी पात्रातील गंगामाई घाटापासूनचा परिसर वाळू तस्कर नेहमीच निवडत असतात. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाळू तस्करी होत असते.

मागील काही दिवसांपूर्वी या ठिकाणी वाळू तस्करांनी भरून ठेवलेल्या वाळूच्या शेकडो गोण्या गंगामाई घाट परिसरात फिरायला येणाऱ्या संगमनेरच्या नागरिकांनी, व्यापारी मित्रांनी वाळू पुन्हा नदीत फेकून गोण्या जाळून नष्ट केल्या होत्या व वाळू तस्करी विरुद्ध तीव्र भावना व्यक्त केल्या होत्या.

त्यानंतर पुन्हा गंगामाई घाटावर फिरायला जाणाऱ्या नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना वाळू तस्करी होत असल्याचे दिसून आले. गंगामाई घाटाच्या पायऱ्यांवर वाळू तस्करांनी रात्री चोरून ठेवलेली वाळू गोण्यांमध्ये भरून ठेवली होती. या गोण्यातली वाळू पुन्हा नदीत ओतून नागरिकांनी या गोण्या जाळून टाकल्या आहेत. ‘नागरिक सतर्क असले तरी महसूल खाते कधी सतर्क होणार’ हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

महसूल मंत्र्यांनी वाळू धोरण जाहीर करून ठिकठिकाणी वाळूची दुकाने सुरू केली आहेत. त्याचे पुढे काय झाले हे जनतेला माहीत नाही. वाळू तस्करीवर ड्रोन द्वारे लक्ष ठेवले जाईल असेही जाहीर करण्यात आले त्याचे हे पुढे काय झाले हे महसूल विभाग आणि मंत्र्यांनाच ठाऊक आहे. वाळू तस्करी मात्र थांबायचे नाव घेत नाही हे या घटनेवरून दिसून येत आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!