समनापुर दगडफेक प्रकरण ; राहता तालुक्यातील ५ जणांसह १७ जणांना अटक !

प्रतिनिधी —

शहरानजीकच्या समनापुर येथे झालेल्या दगडफेक प्रकरणी पोलिसांनी शेजारच्या राहता तालुक्यातील ५ जणांसह एकूण १७ जणांना अटक केली असून त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. दगडफेक प्रकरणामुळे संगमनेर तालुक्याच्या शांततेला गालबोट लागले असून यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

हिंदू समाजावरील अन्याय अत्याचारा विरोधात मंगळवारी सकल हिंदू समाजाने भगवा मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चाला प्रचंड प्रतिसाद लाभला. याशिवाय संगमनेरकरांनी उत्स्फूर्तपणे शंभर टक्के बंद पाळला होता. प्रांताधिकारी कार्यालय समोर झालेल्या भगवा मोर्चाच्या समारोपानंतर नागरिक आपापल्या गावाकडे परतत असताना संगमनेर नजीकच्या समनापुर येथे दगडफेकीची घटना घडली. यात चारचाकी, दुचाकी वाहनांचे नुकसानदेखील मोठ्या प्रमाणात करण्यात आले. याशिवाय दोन कुटुंबीयांवर दगडफेक व मारहाण करण्याचा प्रकार घडला होता.

यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याची माहिती मिळतच जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, पोलीस निरीक्षक देविदास ढ़ुमणे आदींसह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकारामुळे अतिशय नियोजनबद्ध, शांततेत व यशस्वीपणे पार पडलेल्या संगमनेरच्या इतिहासातील सर्वात मोठ्या भगवा मोर्चाला गालबोट देखील लागले.

या संदर्भात संगमनेरमधील खाजगी रुग्णालयात अति दक्षता विभागात उपचार घेणाऱ्या समनापुर येथील रहिवासी व जखमी असलेल्या इस्माईल फकीर मोहम्मद शेख (वय ६० वर्ष) यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून २५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादी हे शेतात घासाला पाणी भरत असताना २० ते २५ भगवे झेंडे घेतलेल्या, भगव्या टोप्या घातलेल्या तरुण मुलांनी मोटार सायकलवरून त्यांच्या घरासमोर येत घरावर दगडफेक केली व घोषणा दिल्या. तसेच दगडफेक करणाऱ्यांनी घरात घुसून नुकसान केले. फिर्यादीच्या तोंडावर लोखंडी रॉड मारल्याने त्यांचे चार दात तुटले. आरोपींनी यांच्या घराजवळ राहणारे फकीर मोहम्मद शेख यांच्या घरावरील करून घरासमोरील मोटार सायकलचे नुकसान केले. तसेच अन्य दोन घरांवर दगडफेक केल्याच्या तक्रारीत म्हटले आहे. दगडफेक करणारे तरुण गावातील नसून ते इतरत्र ठिकाणचे होते, असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. काल मध्यरात्रीपर्यंत पोलिसांनी यातील सतरा आरोपींना अटक केली होती.

पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये उज्वल सोपान घोलप, शुभम बाळासाहेब कडू, तनुज शरद कडू, ऋषिकेश शरद घोलप, महेश विजय कडू (सर्व रा. पाथरे, ता. राहाता), दत्तात्रय संपत थोरात, आबासाहेब शिवराम थोरात, सुनील बाबासाहेब थोरात, ललित अनिल थोरात, प्रमोद संजय थोरात, सत्यम भाऊसाहेब थोरात (सर्व रा. वडगाव पान, ता. संगमनेर), भाऊसाहेब यादव जोंधळे, विकास अण्णासाहेब जोंधळे, अविराज आनंद जोंधळे (सर्व रा. कोकणगाव, ता. संगमनेर) कुणाल ईश्वर काळे, करण ज्ञानेश्वर काळे (दोघे रा. माळेगाव हवेली, ता. संगमनेर) व वैभव रंगनाथ बिडवे (रा. मनोली, ता. संगमनेर) अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!