संगमनेरात भर दिवसा लुटमार : सात लाख रुपये पळवण्याचा प्रयत्न !
तीस हजार नेले ; दोघा बिहारींना पकडले
प्रतिनिधी —
गेल्या सात ते आठ दिवसांपासून हॉट सीटवर असणाऱ्या संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध प्रकारचे गुन्हे घडत आहेत. गुन्ह्यांची मालिका थांबलेली नाही.
बुधवारी दुपारी संगमनेर मार्केट यार्ड या ठिकाणी गाडीच्या डिक्की मधून ७ लाख रुपये काढत असताना आरोपींनी बळजबरीने ते पैसे ओढून नेण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. जबरी चोरी करणाऱ्या तीन आरोपी पैकी दोघांना पकडण्यात यश आले असून एक जण ३० हजार रुपये घेऊन पळून गेला आहे.

अन्नुकुमार अवदेश यादव व अमनकुमार जगन यादव (राहणार नयाटोला, जोराबगंज, तालुका कोढा, जिल्हा कटिहार, बिहार) या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांचा तिसरा साथीदार (नाव माहित नाही) पळून गेला आहे.

बुधवारी दुपारी एक ते दीड वाजण्याच्या सुमारास संगमनेर मार्केट यार्ड या ठिकाणी पांडुरंग यशवंत शेटे (राहणार मालदार रोड, सुकेवाडी) हे काही कामानिमित्त आले होते. आपल्या मोटारसायकलच्या डिक्कीत ठेवलेले ७ लाख रुपये रोख ते बाहेर काढत असताना त्यांच्या वर लक्ष ठेवून असलेल्या तीन आरोपींनी हातातील पैसे बळजबरीने ओढून घेऊन पळ काढला.

आरोपींचा पाठलाग करण्यात आला व त्यातील दोघांना जागेवरच पकडण्यात आले. पळून गेलेल्या एका आरोपीने ३० हजार रुपये रोख रक्कम घेऊन पळून गेला व ताब्यात घेतलेल्या दोन आरोपींकडून ६ लाख ७० हजार रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. शेआटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास संगमनेर शहर पोलीस करत आहेत.

