घारगावचे पोस्ट ऑफीस फोडले ; चोरट्यांनी तिजोरीही नेली चोरून….
पठार भागात चोरट्यांचा धुमाकूळ…!
प्रतिनिधी —
संगमनेर तालुक्यातील घारगाव येथील पोस्ट ऑफिस चोरट्यांनी फोडून तिजोरीच चोरून नेल्याची घटना आज पहाटे घडली आहे.
तर पठारावरील नांदूर खंदरमाळ परिसरातही चोरट्यांनी घरे फोडली आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, घारगाव येथे डाक कार्यालय आहे. आतमध्ये सिमेंट व दगडी बांधकामात केलेली लोखंडी तिजोरी आहे. बुधवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला आणि आत मध्ये असलेली लोखंडी तिजोरी चोरून नेली आहे.
सकाळी काही नागरिकांच्या लक्षात ही गोष्ट आली त्यामुळे त्यांनी घटनेची माहिती पोस्टमन किशोर पोळ यांना दिली.
त्यांनीही घटनेची माहिती वरिष्ठांना दिली त्यामुळे वरिष्ठ साहय्यक अधीक्षक संतोष जोशी, सब पोस्ट मास्तर सुमंत काळे यांनीही घटनास्थळी धाव घेतली त्यानंतर घटनेची माहिती समजताच घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक राजेंद्र लांघे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आहे. दरम्यान तिजोरीत किती पैसे होते ते मात्र समजू शकले नाही.
तर पहाटे नांदूर खंदरमाळ या दोन्ही ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत काही घरे फोडली आहेत. याही घरांमधून मोठ्याप्रमाणात ऐवज गेला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
आता या चोरट्यांचा शोध लावणे घारगाव पोलीसांन पुढे आव्हान होऊन बसले आहे.
