मूळ दैवत असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात जाण्यापासून आदिवासींना प्रतिबंधित केले आहे काय ?

महादेव कोळी संघटनेचा सवाल 

महादेव कोळी समाजाचे थेट राष्ट्रपतींना निवेदन !

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —

राज्यघटना आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आदिवासी हे हिंदू नाहीत मग त्र्यंबकेश्वर मंदिरात बिगर हिंदूंना जाण्यास मनाई करून आदिवासींच्या मूळदैवत महादेवाची पूजा अर्चा करण्यासाठी आदिवासींनाच प्रतिबंधित करण्यात आले आहे काय असा सवाल नाशिक जिल्हा आदिवासी कोळी महादेव समाज विकास संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.

त्र्यंबकेश्वर मंदिरा बाहेर असलेला हिंदू शिवाय मंदिरात जाण्यास सक्त मनाई हा फलक येथील मूळ भूमिपुत्र समस्त आदिवासी समाजाला त्याच्या मूळ दैवत महादेवाचे पूजा अर्चा दर्शन करण्यासाठी नाकारण्यात आला आहे का ? ही शंका उपस्थित करीत सदर त्रंबकेश्वर देवस्थान ट्रस्टवर जिल्हा न्यायालयाचे पदसिद्ध न्यायाधीश हे अध्यक्ष म्हणून आहेत. तरीही असा फलक लावला जात असेल तर हे भारतीय राज्यघटनेचा व न्यायालयाचा अवमान नाही का असा सवल करीत हा फलक कोणाच्या आदेशाने लावला आहे त्याचा तपास करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि हा फलक इथून काढून टाकण्यात यावा अशी मागणी ही संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

संघटनेच्या वतीने नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग देवस्थान ट्रस्ट यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले आहे.

या निवेदनात वरील महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत. त्यानुसार कारवाई करावी अशी मागणी करण्यात आलेली आहे. त्र्यंबकेश्वर परिसरातील सामाजिक सलोखा आणि शांतता बिघडण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. वार्षिक परंपरांना छेद देत त्याला धार्मिक रंग देऊन हा प्रकार मुद्दामून घडवला जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

वास्तविक त्र्यंबकेश्वर नाशिक हे ठिकाण भारतीय संविधानाच्या ५ अनुसूचित येत असून अनुच्छेद २४४ खाली येथील त्र्यंबकेश्वर देवस्थान हे आदिवासींचे आद्य दैवत त्र्यंबकराज महादेव यांचे आहे. हे देवस्थान आदिवासींच्या सामाजिक, सांस्कृतिक प्रथा, परंपरा अस्तित्वाशी निगडित आहे. शेकडो वर्षापासून आदिवासी महादेव कोळी व आदिवासी ठाकर समाज या मंदिरात पूजा अर्चा करून मंदिर व परिसराचे निसर्गाचे संवर्धन करत आला आहे. याचे सर्वच अधिकार हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून या दोन्ही आदिवासी समाजाकडेच राहिले आहे.

असे असताना अशा स्वरूपाचे फलक लिहून सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम करीत असलेल्या संधी साधू व्यक्तींवर कारवाई करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

निवेदनावर जिल्हाप्रमुख दिलीप गांगुर्डे, नाशिक शहराध्यक्ष शशिकांत मोरे, प्रवक्ते देवा वाटाणे, उपजिल्हाप्रमुख बाळूमामा झोले, त्रंबकेश्वर तालुकाप्रमुख अशोक लहांगे, सरचिटणीस विजू पुराणे, माजी नगरसेवक अशोक घागरे, अशोक गोतरणे, बाळू गुंबाडे, विलास कोरडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

संघटनेच्या वतीने हे निवेदन भारताचे राष्ट्रपती, महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री यांना देखील देण्यात आलेले आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!