साकुर : कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला प्रकरणातील आरोपींचा अटकपूर्व जामीन फेटाळला !
आरोपींना अटक न करणे हा न्यायालयाचा अवमान ठरेल ; फिर्यादीचे वकील
आरोपी हे राजकीय प्रस्थ असल्याने अटक करण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप
प्रतिनिधी —
संगमनेर तालुक्यातील पठार भागात असणाऱ्या साकुर गावात ग्रामसभेत प्रश्न विचारल्यामुळे राग आलेल्या स्थानिक सत्ताधाऱ्यांच्या समर्थक पुढाऱ्यांनी येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील इघे यांच्यावर प्राणघातक हल्ला करीत त्यांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांच्याबरोबर असलेल्या मित्राला जातीवाचक शिवेगाळ करून त्यालाही मारून टाकण्याच्या धमक्या दिल्या. याप्रकरणी घारगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. यातील फक्त तीनच आरोपींना अटक झाली होती. बाकीचे आरोपी फरार होते. या आरोपींनी संगमनेर जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र न्यायालयाने तो फेटाळून लावला आहे.

संगमनेर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूका सुमारे महिनाभरापूर्वी पार पडल्या. या निवडणुका झाल्यानंतर साकुर येथील आयोजित ग्रामसभेत सामाजिक कार्यकर्ते सुनील इघे यांनी पंचक्रोशीतील समस्यांबाबत प्रश्न विचारले. तसेच गावातील मूलभूत समस्या सोडवण्यासाठी विविध मुद्दे उपस्थित केले. याचा राग येऊन तेथील पुढार्यांनी इघे यांना ग्रामसभेतच धमक्या दिल्या होत्या.

त्यानंतर रात्री इघे हे त्यांच्या मित्रां बरोबर साकुर कडे जात असताना एका घाटात गाठून १५ ते २० जणांच्या टोळीने यांच्यावर प्राण घातक हल्ला केला होता. यामध्ये लोखंडी रॉड, काठ्या, कोयता आणि रिव्हॉल्वर चा देखील वापर झाला होता. इघे यांना बेदम मारहाण करून अर्ध मेले करून सोडण्यात आले होते. पोलिसांनी सुमारे १६ प्रमुख आरोपींसह इतर दहा ते पंधरा जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न आणि ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हे दाखल केले आहेत.

यातील आरोपी राजकारणाशी संबंधित आहेत. माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या अधिपत्याखाली असणाऱ्या विविध सहकारी संस्था आणि राजकीय संस्थांचे पदाधिकारी असलेले काही पुढारी मंडळी या घटनेतील आरोपी आहेत. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांवर राजकीय दबाव असल्याचे बोलले जात होते. पोलिसांनी यातील तीन आरोपींना अटक केली. मात्र इतर सर्व आरोपी फरार झाले होते. हे आरोपी अद्याप पोलिसांना सापडलेले नाहीत असे पोलिसांचे म्हणणे आहे.

दरम्यान या आरोपींनी संगमनेतील जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता. हा अर्ज जिल्हा सत्र न्यायाधीश यो.प्र. मनाठकर यांनी फेटाळून लावलेला आहे. अर्ज फेटाळून लावताना सरकारी वकिलांनी मांडलेले विविध मुद्दे आणि युक्तिवाद व फिर्यादीचे वकील प्रकाश आहेर यांनी केलेला युक्तिवाद मान्य करीत आरोपींना जामीन नाकारला आहे. त्यामुळे आरोपींना आता उच्च न्यायालयात जाण्या शिवाय पर्याय राहिलेला नाही.

दरम्यान या प्रकरणाचा तपास संगमनेर उपविभागाचे प्रभारी पोलीस उपअधीक्षक संजय सातव यांच्याकडे आहे. त्यामुळे उप अधीक्षक यांनी तातडीने उर्वरित सर्व आरोपींना अटक करावी अशी मागणी फिर्यादीचे वकील आहेर यांनी केली असून आरोपींना अटक केली नाही तर तो न्यायालयाचा अवमान ठरेल असे त्यांनी उपअधीक्षक यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. या पत्राच्या प्रती पोलीस अधीक्षक आणि राज्यातील वरिष्ठ पोलीस विभागांना आणि मंत्रालयातील ॲट्रॉसिटी कायदा नोडल ऑफिसर यांना पाठविण्यात आल्या आहेत.
