मी खादाड आहे…! भूक लागली की चिडचिड होते !!    देवेंद्र फडणवीस

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिवाळीनिमित्त पत्रकारांशी गप्पा मारताना राज्यातील राजकारणापासून ते आपल्या आवडीनिवडी, लहानपणीचे किस्से यासह अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.

राजकीय आणि प्रशासकीय विधानांपेक्षा फडणवीस यांनी त्यांच्या आवडीनिवडींबद्दल आणि सूचक पद्धतीने दिलेल्या उत्तरांचीच जास्त चर्चा रंगली.

या अनौपचारिक चर्चेमध्ये फडणवीस यांनी अगदी विद्यमान सरकारमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या झोपेपासून ते भूक लागल्यावर होणारी चिडचीड याबद्दलही मनोकळेपणे गप्पा मारल्या.

पुन्हा मुख्यमंत्री कधी होणार आणि ‘वर्षां’ निवासस्थानी राहायला जाणार का, या प्रश्नांवर फडणवीस यांनी मिश्कील शैलीत उत्तर दिले.

‘मी सध्याच्या ‘सागर’ निवासस्थानी मजेत आहे. ‘वर्षां’ म्हणजे पाऊस आणि पाऊस सागरालाच मिळतो. त्यामुळे ‘वर्षां’वर जाण्याचा कोणताही विचार नाही, असं फडणवीस म्हणाले आणि एकच हशा पिकला.

नवी दिल्लीला ‘सागर’च नसल्याने तेथे जाण्याचाही प्रश्नच नसल्याचे त्यांनी सांगितल्यावर हास्यकल्लोळ झाला.

मंत्रिमंडळाचा विस्तार विधिमंडळाच्या अधिवेशनापूर्वी होईल, असे त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

‘‘महाराष्ट्राच्या राजकारणात कधी नव्हे, एवढी कटुता आली आहे, हे नाकारता येणार नाही,” अशी कबुली फडणवीस यांनी दिली.

फडणवीस यांनी राजकीय मुद्द्यांबरोबरच आपल्या आवडीनिवडींबाबतच्या प्रश्नांना मनमोकळेपणे उत्तरे दिली.

मला चांगली उंची असलेल्या नवनवीन गाड्या चालवायला आवडतात, असं फडणवीस म्हणाले. आणि या गाडी प्रेमाचं त्यांना भेटायला येणाऱ्यांशी काय कनेक्शन आहे याबद्दलही त्यांनी भाष्य केलं.

त्यामुळे चांगली गाडी घेऊन कोणी भेटायला आले, की मी त्यांना रात्री बोलावतो आणि एक-दीड तास गाडीतून मनसोक्त फिरतो, असं फडणवीस यांनी सांगितलं.

तसा मी खादाडच आहे आणि सर्वच पदार्थ आवडतात, असं फडणवीस यांनी आपल्या जेवण्याच्या आवडीनिवडीबद्दल विचारलं असता सांगितलं.

भूक लागल्यावर मी बेचैन होतो आणि राग येतो, असं फडणवीस म्हणाले.

त्यामुळे रागावल्यावर मला खायला मिळाले की लगेच माझा राग निवळतो, असंही ते म्हणाले.

चांगली तब्येत राखण्यासाठी मनात आले की एक-दीड महिना व्यायामशाळेत जातो आणि पुन्हा सहा महिने तिकडे फिरकत नाही, असे फडणवीस म्हणाले.

मी शक्यतो पाच तास झोप घेतो. मध्यरात्री तीनला झोपतो आणि सकाळी आठला उठतो, असं फडणवीस यांनी सांगितलं.

पण आठवड्यातून दोन-तीनदा सकाळी सात-आठलाच लवकर बाहेर पडावे लागते. त्यामुळे अतिशय कमी झोपेची मला वर्षांनुवर्षे सवय आहे, असं उपमुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या झोपेसंदर्भातही फडणवीसांनी यावेळी विधान केलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर रात्री उशिराच काय पहाटेपर्यंत फिरतात, असं फडणवीस म्हणाले.

त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे नेमके झोपतात कधी, हा संशोधनाचा विषय आहे, असे फडणवीस म्हणाले.

महाराष्ट्राच्या राजकारणातील कटुता राजकीय वैमनस्यापर्यंत गेली आहे. महाराष्ट्राची अशी राजकीय संस्कृती नाही. राजकीय मतभेद असले तरी सर्व पक्षांतील नेते एकमेकांशी बोलू शकतात, असं फडणवीस म्हणाले.

तसेच, ही कटुता कशी कमी करता येईल, यासाठी मी प्रयत्न करणार आहे, असे फडणवीस म्हणाले.

ही कटुता कमी करण्यासाठीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिवाळीच्या शुभेच्छा देणार का? असा प्रश्न फडणवीस यांना विचारण्यात आला.

या प्रश्नावर अजून शुभेच्छा दिलेल्या नाहीत, असे त्यांनी सांगितले.

(सौजन्य लोकसत्ता)

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!