शुक्रवारी संगमनेर शहरातील काही भागात पाणीपुरवठा होणार नाही
म्हाळूंगी नदीवरील पूल खचल्याने पाईपलाईन तुटली
प्रतिनिधी —
म्हाळूंगी नदीवरील पूल खचल्यामुळे शहरातील नेहरू गार्डन आणि परदेश पुरा जल कुंभा वरील झोनमध्ये उद्या (शुक्रवार) सकाळचा पाणीपुरवठा होणार नसल्याचे नगरपालिकेच्या वतीने कळविण्यात आले आहे. उद्या सायंकाळपर्यंत तातडीने दुरुस्ती करून पाणीपुरवठा करण्याचा पालिकेचा प्रयत्न असला तरी नागरिकांनी पाणी काटकसरणी वापरावे असे आवाहन करण्यात आले आहे.

संगमनेर शहरातील साई मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील म्हाळूंगी नदीवरचा पूल पूर्णपणे खचल्यामुळे पुलावरून जाणारी संगमनेर शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन तुटली आहे त्यामुळे संगमनेर शहरातील काही भागाला उद्या सकाळी पाणीपुरवठा होणार नाही.

उद्या शुक्रवार (१४ ऑक्टोबर २०२२) सकाळी नेहरू गार्डन जलकुंभ संपूर्ण झोन, पोलीस लाईन, देवाचा मळा, मेन रोड, मोमीनपुरा, तीन बत्ती चौक, स्टेडियम जवळ अभंग मळा, पंजाबी कॉलनी, सावता माळी नगर, माळीवाडा, अशोक चौक इत्यादी परिसरात…
तसेच परदेशपुरा टाकीवरील झोन, नाईकवाड पुरा, परदेश पुरा, घास बाजार, देवी गल्ली, जोर्वे रोड चौक, सय्यदबाबा चौक परिसर इत्यादी परिसर यांचा पाणीपुरवठा होणार नाही.

तरी नागरिकांनी पाणी जपून व काटकसरीने वापरून नगरपालिकेस सहकार्य करावेअसे आवाहन संगमनेर नगर परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.
शनी मंदिराकडून साई मंदिराकडे जात असताना म्हाळूंगी नदीवर असलेला पुल आज सकाळी खचल्याचे लक्षात आले. त्याचे प्रमाण वाढत गेल्याने पुलावरील संगमनेर शहरातील महत्त्वाच्या जलकुंभांना पाणीपुरवठा करणाऱ्या लोखंडी पाईपलाईन तुटल्या. त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे. संगमनेरच्या माजी नगराध्यक्ष दुर्गा तांबे यांनी घटनास्थळी भेट देऊन नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना दुरुस्तीसाठी सूचना दिल्या आहेत. तसेच विधान परिषदेचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी देखील घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.

