बस स्थानकासमोरच्या रस्त्यावरील अतिक्रमणे हटवली !
रिकामटेकड्या शहर सेवकांचा दबाव आणण्याचा प्रयत्न
प्रतिनिधी —
गेल्या दोन दिवसापासून संगमनेर बस स्थानक समोर रस्त्यावर असलेले अतिक्रमण नगरपालिकेने हटवले आहे. मंगळवारपासून सलग ही कारवाई सुरू आहे आता किती दिवस ही परिस्थिती राहील याकडे जनतेचे लक्ष लागून आहे.

बस स्थानका समोरून जाणाऱ्या शहरातील पुणे नाशिक महामार्गावर अगदी रोडवरच हॉकर्स, हातगाड्या, फळ विक्रीचे दुकाने, जाहिरातींचे फलक, फ्लेक्स बोर्ड, खाद्यपदार्थांच्या हातगाड्या यांनी अतिक्रमण करून रस्ता अरुंद केला होता.
‘संगमनेर टाइम्सने’ याला वाचा फोडल्यावर नगरपालिकेने प्रशासनाने गंभीर दखल घेत मंगळवारपासून येथील अतिक्रमण हटविले आहेत. सध्या तरी बस स्थानकासमोरील हा रस्ता मोकळा दिसत आहे.

शहरातील अतिक्रमण हटणार कधी ? संगमनेर टाइम्सने हा विषय मांडला होता. भाजीबाजार वाले, भाजीपाला विक्रेते, फळ विक्रेते, हातगाड्या वाले, होकर्स, खाद्यपदार्थांच्या गाड्या यांनी शहरातील महत्त्वाच्या चौकांचे आणि रस्त्यांचे विद्रूपीकरण केले आहे.

सध्या बस स्थानकासमोर कारवाई झाली असली तरी शहरातून जाणारा जुना पुणे नाशिक महामार्ग प्रवरा नदीच्या मोठ्या पुलापासून ते थेट घुलेवाडी फाट्यापर्यंत दुतर्फा अतिक्रमणांनी वेढलेला असतो. ही सर्वच अतिक्रमण रोडवरून काढली पाहिजेत. निदान रस्ता तरी मोकळा राहावा अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे.

कारवाईत सातत्य हवे
अतिक्रमणांनी आणि फ्लेक्स बोर्ड संगमनेर शहराचे केलेले विद्रूपीकरण चव्हाट्यावर येताच नगरपालिकेने ही कारवाई सुरू केली. दोन दिवसापासून बस स्थानकासमोर अतिक्रमणे काढून टाकली आहेत. मात्र पुन्हा परिस्थिती जैसे थे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने अशी कारवाई सातत्याने सुरू ठेवून येथील अतिक्रमण करणाऱ्यांची ही वाईट सवय मोडून काढायला हवी. तसेच शहरातील दिल्ली नाका, अकोले नाका, पुणे नाका आणि थेट कॉलेज पर्यंत सर्वच बाजूला असलेली रस्त्यांच्या कडेची सर्व प्रकारची अतिक्रमणे हटवण्याची आवश्यकता आता निर्माण झालेली आहे.

मध्यवर्ती शहरांतर्गत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते बाजारपेठ या रस्त्यादरम्यान मोमीन पुरा चौक, अशोक चौक, चावडी, जुने कटारिया क्लॉथ स्टोअर, बाजारपेठ, मेनरोड आदी ठिकाणी देखील रस्त्यावर अतिक्रमणे नेहमीच वाढलेली दिसतात. दुकानदार देखील रस्त्यावर बऱ्याच वस्तू आणून ठेवतात. त्यामुळे या ठिकाणी देखील वाहतुकीच्या अडचणी निर्माण होतात.
रिकामटेकड्या शहर सेवकांचा हस्तक्षेप !
नगरपालिका हे अतिक्रमण हटवत असताना गेल्या दोन दिवसांपासून अतिक्रमण काढू नये म्हणून काही सध्या रिकामे असलेल्या माजी नगरसेवकांनी, माजी नगराध्यक्षांनी हस्तक्षेप करून आपल्या मर्जीतल्या लोकांची अतिक्रमणे काढू नयेत असे फोन केले. मात्र सर्वांवर सरसकट कारवाई करण्यात आली. आता पुन्हा येथे हातगाड्या लावण्यासाठी आणि दुकाने टाकण्यासाठी दिवाळीचे कारण पुढे करून नगरपालिकेच्या प्रशासनावर दबाव आणला जाऊ शकतो. हा बेशरमपणा ठरेल असे नागरिकांमधून बोलले जात आहे.

अतिक्रमण करणाऱ्यांचा डबल धंदा !
नवे बस स्थानक बांधण्याआधी जुन्या संगमनेर बस स्थानका समोरील टपऱ्या हटवताना पैशांचे व्यवहार झाले. काहींनी पैसे घेऊन जागा सोडल्या. काहींनी गाळे घेतले. आता हे गाळे भाड्याने देऊन पुन्हा रस्त्यावर दुकाने थाटण्याचे काम करून पैसे गोळा करण्याचे काम चालू आहे. एकेकाचे चार चार दुकाने आहेत. अतिक्रमण करणाऱ्यांचा हा डबल धंदा चालू असल्याचे आरोप आता जनतेमधून होतात.

