दोषी व्यक्तींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा — महसूलमंत्री विखे पाटील यांचे आदेश
विजेचा शॉक लागून चार भावंडांचा झाला होता मृत्यू ; कुटुंबीयांना प्रत्येकी ११ लाखाची मदत
प्रतिनिधी —
तालुक्यातील खंदरमाळवाडी येथे विजेचा शॉक लागून ४ लहान मुलांच्या मृत्यूस विज वितरण कंपनीचा हलगर्जीपणा समोर आला असून, यामध्ये दोषी व्यक्तींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला. मृत मुलांच्या कुटूंबियांना प्रत्येकी ११ लाख रुपयांची मदत आणि या भागातील सर्व आदीवासी कुटूंबियांच्या घरकुलांचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सुचना त्यांनी प्रशासनास दिल्या.

वादळीवाऱ्यासह पावसाने नुकसान झालेल्या विज वितरण कंपनीच्या वीज वाहक तारा तातडीने पुर्ववत करण्यासाठी वीज वितरण कंपनीने विशेष मोहिम जिल्हयामध्ये हाती घेण्याबाबतही त्यांनी अधिकाऱ्यांना सुचित केले.

खंदरमाळवाडी येथील गंभीर घटनेची दखल घेवून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गावात येवून बर्डे कुटूंबियांची सांत्वनपर भेट घेवून त्यांना दिलासा दिला. काल रात्री मृतदेह ताब्यात मिळाल्यानंतरही अंत्यविधी न करण्याचा निर्णय कूटूंब आणि ग्रामस्थांनी घेतला होता. मात्र पालकमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर या चारही मुलांवर शोकाकुल वातावरण अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी मंत्री विखे पाटील यांनी येठेवाडी येथील ग्रामस्थ आणि पदाधिकाऱ्यांशी एकत्रितपणे चर्चा करुन गावातील प्रलंबित प्रश्न जाणून घेतले. अधिकाऱ्यांना या प्रश्नांबाबत गांभिर्याने निर्णय घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळेच कालची घटना घडली आहे. त्यामुळे या घटनेस जबाबदार असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या आदेश त्यांनी दिले. वीज वितरण कंपनी, मुख्यमंत्री सहायता निधी आणि स्व.गोपिनाथ मुंढे अपघात विमा योजनेतून प्रत्येकी कुटूंबियांना ११ लाख रुपयांची मदत देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

