शेतकऱ्यांनो पीक पाहणी नोंदवा अन्यथा योजनांचा लाभ मिळण्यास अडचण !
महसूल विभागाचे आवाहन
प्रतिनिधी —
संगमनेर तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी अद्याप पर्यंत पीक पाहणी नोंदवली नाही अशा शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यास अडचण येऊ शकते असे प्रसिद्धी पत्रक संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, तालुक्यातील तमाम शेतकरी बांधवांनी आपल्या शेताची इ – पीक पाहणी नोंदवावी. पीक पाहणी मोबाईल वरून करण्याची सुविधा शासनाने दिलेली आहे. तरी अद्याप पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी मोबाईल वरून आपल्या शेतातील पिकाची नोंदणी केली नाही त्यांनी प्ले स्टोअरवर जाऊन ही इ – पीक पाहणी व्हर्जन 2 हे ॲप डाऊनलोड करून पीक पाणी नोंदणी करावी.

पिक पाहणी नोंदवले करण्याची अंतिम मुदत १५ ऑक्टोबर २०२२ आहे. आपण पीक पाहणी न नोंदविल्यास शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यास अडचण येऊ शकते. पीक पाहणी नोंदणी करताना अडचण आल्यास मंडळ अधिकारी व तलाठी यांच्याशी संपर्क साधावा.

तसेच मंडळ अधिकारी, तलाठी, पोलीस पाटील व कोतवाल हे आपल्या कार्यक्षेत्रामध्ये उपस्थित राहून पाहणीच्या कामकाजा संदर्भात शनिवार दिनांक ८ ऑक्टोबर व रविवार दिनांक ९ ऑक्टोबर २०२२ रोजी क्षेत्रीय कामकाजा करिता, शेतकरी बांधवांच्या मदती करता उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी सातबारा पीक पाहणी नोंदणी करावी. असे आव्हान तहसीलदार निकम यांनी केले आहे.

