दोन दिवसांत २ हजार ९३३ लाभार्थ्यांचे हयातीचे दाखले गावातच जमा !
संगमनेर महसूल विभागाचा उपक्रम
“तालुक्याच्या ठिकाणी यावे लागले नाही यामुळे अनेकांनी व्यक्त केले समाधान”
प्रतिनिधी–
राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्यात संगमनेर तालुक्यातून दिनांक २९ व ३० सप्टेंबर या दोन दिवसात गावपातळीवरील मंडळ अधिकारी, तलाठी यांच्या उपस्थितीत झालेल्या शिबिरांच्या माध्यमातून तब्बल २ हजार ९३३ लाभार्थ्यांचे हयातीचे दाखले व आवश्यक कागदपत्रे प्राप्त करून घेण्यात आले.

सामाजिक विशेष सहाय्य योजनेच्या हयातीचे दाखले सादर करण्यासाठी तहसीलच्या चकरा मारणाऱ्या लाभार्थ्यांना यावर्षी धक्का बसला. संगमनेर तालुक्यातील लाभार्थ्यांचे हयातीचे दाखले प्रत्यक्ष गावात भेट देऊन प्राप्त करण्यासाठी गावपातळीवर शिबिरे घेण्याचे आदेश महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी महसूल यंत्रणेला दिले.

त्यानुसार राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा निमित्ताने प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार अमोल निकम यांनी तालुक्यातील १० मंडळातील गावांत शिबिरे घेण्याचे नियोजन केले. शिबिराबाबत गावपातळीवर आवश्यक प्रसिद्धी देण्यात आली.

या लाभार्थ्यांना प्रतिमहा १००० रुपये तर लाभार्थी महिला विधवा व तिला एक अपत्य असल्यास ११०० रुपये, विधवा महिलेचे दान अपत्य असल्यास १२०० रूपये अर्थसहाय्य शासनाकडून दिले जात असते. लाभार्थ्यांना या अनुदानाचा लाभ देताना दरवर्षी हयातीचा दाखला महसूलयंत्रणेकडून तपासला जातो. ज्यांचे हयातीचे दाखले प्राप्त नसतील त्यांचे अनुदान तात्पुरते बंद करण्यात येते.

सामाजिक विशेष सहाय्य योजनेत संजय गांधी निराधार योजना ४८३० श्रावण बाळ निराधार अनुदानयोजना ९६९३ इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी विधवा अनुदान योजना ३७५४ असे एकूण १८२७७ लाभार्थी तालुक्यात आहेत. या लाभार्थ्यांना दरमहा १ कोटी ५३ लाख रूपयांचे अनुदान वर्ग करण्यात येते. मागील वर्षी अनुदानापोटी १८ कोटी ६७ लाख रुपये वाटप करण्यात आले.

संगमनेर तालुक्यातील १८२७७ लाभार्थ्यांपैकी सुमारे ३३०० लाभार्थ्यांचे हयातीचे दाखले प्राप्त नसल्यामुळे त्यांना अनुदान वितरित केले जात नव्हते. याबाबत तहसील कार्यालयाकडून प्रसिद्धी देण्यात आले. गाव, पाड्या-वस्त्यांवर आवाहन करणारे फलक, नोटीस लावल्या. मात्र तरीही लाभार्थ्यांकडून हयातीचे व उत्पन्नाचे दाखले मिळत नव्हते. हयातीचे व उत्पन्नाचे दाखले प्राप्त करून घेण्यापासून ते सादर करण्यापर्यंत शिबिरे आयोजित करून प्रशासनाने खातरजमा केली आहे.

संगमनेर मधील १० मंडळातील संगमनेर, घुलेवाडी, समनापुर, निळवंडे, तळेगांव, निमोण, कनोली, मनोली, शिबलापुर, आश्वी बुद्रुक, आश्वी खुर्द, जोर्वे, पिंपरणे, पिंपळगाव देपा, निमगाव जाळी, साकुर, डोळासणे, धांधरफळ, बोटा, चंदनापुरी, घारगाव या गावांत २९ व ३० सप्टेंबर या दोन दिवसात शिबिरे घेण्यात आली. या दोन दिवसांच्या शिबिरात २ हजार ९३३ लाभार्थ्यांचे हयातीचे व उत्पन्नाचे दाखले प्राप्त करून घेण्यात आले. यामध्ये बहुतांश लाभार्थी वयस्कर व दिव्यांग होते. या शिबिरात उपस्थित असलेल्या लाभार्थी यांनी त्यांच्या गावातच असे शिबीर आयोजित केले त्याबद्दल समाधान व्यक्त केले.

उर्वरित सुमारे ४०० लाभार्थ्यांमध्ये काही स्थलांतरित व काही मृत असल्याचे आढळून आले. सदरच्या शिबिरांच्या यशस्वीतेसाठी नायब तहसीलदार राजेश पौळ, संजय गांधी योजना शाखेतील सर्व कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न केले. शिबिराच्या ठिकाणी सर्व मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल व पोलीस पाटील हे हजर होते.

