२६ सप्टेंबरपर्यत शेतीच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण करा !   महसूल मंत्र्यांचे आदेश

प्रतिनिधी —

महसूल, कृषी व ग्रामविकास विभागांनी ताळमेळ ठेवून समन्वयाने कामकाज करत अतिवृष्टीने बाधित झालेल्या क्षेत्राचे २६ सप्टेंबर २०२२ पर्यंत शंभर टक्के पंचनामे पूर्ण करावेत आणि शेतकऱ्यांना द्यावयाच्या नुकसान भरपाई संदर्भात माहिती सादर करावी असे निर्देश राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दूग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.

अतिवृष्टीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे झालेले नुकसान आणि पंचनाम्याबाबतची आढावा बैठक महसूलमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे, जिल्हयातील उपविभागीय अधिकारी यांच्याशी संवाद साधून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा महसूल मंडळनिहाय आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला खासदार डॉ. सुजय विखे पाटील, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, जिल्हा परिषद मुख्याधिकारी आशिष येरेकर, नगर उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप उपस्थित होते.

महसूलमंत्री श्री.विखे पाटील म्हणाले, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आणि पीक पंचनाम्याच्या कामांना प्राधान्य दिले पाहिजे. शेतकऱ्यांना संकटातून दिलासा देण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सकारात्मक राहून कामकाज केले पाहिजे. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागातील एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता प्रशासनाने घ्यावी. नुकसान भरपाई संदर्भात गेल्या तीन वर्षांतील पिक लागवडीचा निकष ग्राह्य धरण्यात येतो तथापि, बदलत्या काळानुसार त्यामधे सुधारणा करण्यासाठी शासनाला तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही त्यांनी महसूल यंत्रणेला दिले. फळबागांच्या नुकसानीच्या पंचनाम्याचे काम कृषी विभागाने करावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

खासदार डॉ.सुजय विखे यांनी, अतिवृष्टीमुळे बाधित आणि नुकसानीची पाहणी ऑनलाईन पद्धतीऐवजी ऑफलाईन पध्दतीने करावी, तसेच शेतकऱ्यांना शासनातर्फे द्यावयाच्या नुकसान भरपाईचा गैरवापर होऊ नये अशी सूचना केली.

जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी, शासकीय यंत्रणा शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष नुकसानीचा आढावा घेत असून जिल्हयातील सुमारे चार हजार हेक्टर शेतजमीनीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे सांगितले. यावेळी जिल्हयातील सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांनी पीक पंचनाम्याच्या प्रगतीविषयी माहिती सादर केली.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!