सहकारी दूध संघामुळे तालुक्यात आर्थिक समृद्धी – माजी मंत्री आमदार थोरात
लंम्पी आजार रोखण्यासाठी मोफत लस पुरवठा करणार.
प्रतिनिधी —
१९७७ मध्ये तालुक्यात दूध व्यवसायाला सुरुवात झाली. त्यावेळी मोठी जनजागृती करण्यात आली. अनेक दिवसांच्या कष्टातून तालुक्यात दूध व्यवसाय उभा राहिला आहे. या दूध व्यवसायाने व सहकारी दूध संघामुळे तालुक्यात आर्थिक समृद्धी निर्माण झाली असून उत्पादकांनी खासगीच्या तात्पुरत्या आमिषाला बळी न पडता सहकारी संघाच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहावे असे आवाहन माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघाच्या ४५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख हे होते. तर व्यासपीठावर आमदार डॉ. सुधीर तांबे, ज्येष्ठ नेते बाजीराव खेमनर, ॲड. माधवराव कानवडे, दुर्गाताई तांबे, इंद्रजीत थोरात, बाबा ओहोळ, डॉ. जयश्री थोरात, शंकर खेमनर, गणपतराव सांगळे, संपतराव डोंगरे, रामहरी कातोरे, नवनाथ अरगडे, राजेंद्र चकोर, लक्ष्मणराव कुटे, आर.बी .रहाणे, कार्यकारी संचालक डॉ. सुजित खिलारी, अर्चना बालोडे, मीरा शेटे, रावसाहेब वर्पे, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. तुंबारे आदी उपस्थित होते.

आमदार थोरात म्हणाले की, संगमनेर तालुका हा दुधाचा तालुका म्हणून ओळखला जात आहे. गुणवत्ता, सात्विकता व प्रामाणिकपणा यामुळे राज्यभरात राजहंस दूध संघाचा लौकिक निर्माण झाला आहे. सुरत, गुलबर्गा, विदर्भ, नागपूर, चंद्रपूर अशा अनेक विविध ठिकाणी दूध विक्री होत आहे. वर्षानुवर्षे केलेल्या प्रामाणिक कामातूनही हे यश मिळाले आहे.

मागील दोन वर्ष कोरोना संकटामध्ये शेतकऱ्यांना मोठी मदत या दूध संघाने केली आहे. अशा संकटात संगमनेर तालुका दूध संघ सर्वात पुढे मदतीसाठी होता.यावेळेस खासगीवाले कुठे दिसत नव्हते. कोरोनात त्यांनी कुठेही मदत केली नाही. आज लंम्पी आजार वाढलेला आहे. अशा काळात किंवा पशुधन वाचवण्यासाठी ७५ डॉक्टरांची टीम काम करत आहे. विविध योजना राबवल्या जात आहेत. या कामांमध्ये खासगीवाले कुठेही नसतात. मात्र ते एक- दोन रुपयाचे आमीष दाखवतात आणि काही लोक त्याला बळी पडतात. सहकारी संघ टिकला तरच वैभव टिकणार आहे. उत्पादकांना भाव मिळणार आहे. म्हणून तालुक्याच्या व सर्वसामान्यांच्या हिताकरता सहकारी संस्था टिकल्या पाहिजे, वाढल्या पाहिजेत. याकरता खासगी सेंटरकडे दूध न टाकता दूध उत्पादकांना मदतीची भूमिका ठेवणाऱ्या सहकारी संघाच्या पाठीशी भक्कम उभे राहावे असे आवाहन त्यांनी केले.

आमदार डॉ. तांबे म्हणाले की, सध्या देशात भांडवलदारांचे रक्षण करणारे सरकार आहे. सर्वसामान्यांच्या विकासासाठी सहकाराची व्यवस्था असून प्रत्येक कार्यकर्त्याने सहकारावर निष्ठा ठेवली पाहिजे. स्वच्छ व पारदर्शक कारभारामुळे संगमनेरच्या सहकार देशात लौकिकास्पद ठरला आहे. पशुधनाबाबत स्वच्छता ठेवताना प्रत्येक गाईंचा विमा उतरावा असे आवाहन ही त्यांनी केले.

तर रणजीतसिंह देशमुख म्हणाले की, कोरोना काळामध्ये सर्व उद्योग व्यवसायांना मोठा फटका बसला. याला आपला दूध संघ ही अपवाद नाही. त्या काळात दूध संघाने तयार केलेली पावडर स्टॉक होती. या आर्थिक वर्षात त्याची विक्री केली. मात्र उत्पादन खर्च आणि विक्री दरातील तफावत यामुळे त्याचा बोजा या वर्षात पडणार आहे. तसेच कोरोनामुळे विक्रीलाही फटका बसला असून डिझेल दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढतो आहे. कोरोना संकटामुळे दूध विक्री कमी झाली आहे.

कोरोना संकटाच्या काळात आपण महानंदासाठी सरकारकडून ७० कोटी रुपये मंजूर करून घेतले. दररोज दहा लाख लिटरची पावडर बनवण्यास मंजुरी घेतली. यातून राज्यभरातील दूध उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला. तालुक्यातही सातत्याने पशुधन, त्यांचे आरोग्य याकरता विविध उपक्रम आपण राबवत आहोत. राजहंस संघाचा सरासरीचा दूध भाव हा जास्त आहे. मात्र खासगी वाले काहीतरी अपप्रचार करतात. ते आपण वेळीच रोखले पाहिजे. कृत्रिम रेतन, आरोग्याची काळजी याकरता सहकारी दूध संघाने सातत्याने पुढाकार घेतला आहे. नुकत्याच आलेल्या लंम्पी आजाराबाबत तालुक्यात गाईंचे लसीकरण सुरु केले आहे. जनावरांचे मेडिकल तपासणी, औषधे, प्रयोगशाळा यामधूनही उत्पादकांना मोठा लाभ मिळत असून स्टेट बँकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या योजनेतून ५०० शेतकऱ्यांना सुमारे आठ कोटींचे कर्ज वितरण केले आहे. सातत्याने शेतकऱ्यांच्या काळजी करणाऱ्या दूध संघाच्या पाठीशी आपण उभे राहावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

यावेळी साहेबराव गडाख, मोहन करंजकर, अविनाश सोनवणे, हौशीराम सोनवणे, संचालक विलास वर्पे, भास्कर सिनारे, संतोष मांडेकर, विलास कवडे, बबन कुराडे, बादशाह वाळुंज, संजय पोकळे, विक्रम थोरात, विष्णू ढोले, तुकाराम दातीर, रवींद्र रोहम, प्रतिभा जोंधळे, मंदा नवले, गणपत शिंदे, भारत मुंगसे, सुभाष सांगळे, सोमेश्वर दिवटे आदी उपस्थित होते.
या बैठकीचे प्रास्ताविक ज्येष्ठ संचालक लक्ष्मणराव कुटे यांनी केले नोटीस वाचन कार्यकारी संचालक डॉ. सुजित खिलारी यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ व सुरेश जोंधळे यांनी केले तर व्हा. चेअरमन राजेंद्र चकोर यांनी आभार मानले.

लंम्पी आजारासाठी मोफत लस पुरवठा
राजहंस दूध संघाच्या वतीने लंम्पी या आजाराबाबत तातडीने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या असून तालुक्यात गायींचे लसीकरण केले आहे. तर आगामी काळात पशुधन वाचवण्यासाठी तालुक्यातील सर्व पशुधनासाठी मोफत लसपुरवठा करण्यात येईल असे रणजीतसिंह देशमुख यांनी सांगितले आहे.
