संगमनेरात गणित व विज्ञान विषयांसाठी सुपर टॅलेंट हंट प्रकल्प !
IAS, IPS, IIT, NEET, JEE परीक्षांची सहावी पासून तयारी
प्रतिनिधी —
ग्रामीण भागात असूनही गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे हब बनलेल्या संगमनेर तालुक्यातील इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून गणित व विज्ञान विषयांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे पेस कोचींग क्लासेस च्या वतीने सुपर संगमनेर टॅलेंट हंट प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पाअंतर्गत संगमनेर तालुक्यातील ३६ शाळांमधून सर्व विद्यार्थ्यांना या शैक्षणिक वर्षापासून निशुल्क ट्रेनिंग सुरू करण्यात येणार आहे.

एकविरा फाउंडेशनने कॅन्सर डॉ. जयश्री थोरात यांच्या पुढाकारातून हा विशेष उपक्रम तालुक्यातील १२ हजार विद्यार्थ्यांसाठी सुरू केला आहे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात महाविद्यालयातील के.बी.दादा सभागृह येथे तालुक्यातील सर्व शाळांमधील गणित व विज्ञान विषयाच्या सुमारे २०० शिक्षकांना सुपर संगमनेर प्रकल्पाअंतर्गत मार्गदर्शन शिबिर झाले. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही या शिक्षकांना मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. जयश्री थोरात, रजिस्ट्रार बाबुराव गवांदे आदींसह मुख्याध्यापक उपस्थित होते.

संगमनेर हे गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे केंद्र ठरले आहे. तरीही अनेक विद्यार्थी आयएएस, आयपीएस,एमपीएससी,नीट,जेईई या विविध परीक्षांसाठी मुंबई – पुणे-नाशिक या मेट्रो शहरात जात असतात. या परीक्षांच्या तयारीसाठी असणाऱ्या क्लासची फी सर्वसामान्याच्या आवक्याबाहेर असते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ही फि परवडणारी नसते. त्यामुळे गुणवत्ता असूनही ही अनेक हुशार विद्यार्थी या परीक्षांपासून वंचित राहतात.

अशा विद्यार्थ्यांना सुपर संगमनेर प्रकल्प अंतर्गत विशेष शिक्षण मिळावे याकरता मंत्री थोरात यांनी पुढाकार घेतला असून त्यांचे स्नेही व राष्ट्रीय कीर्तीचे शिक्षणतज्ञ पेस कोचिंग क्लासेस चे संचालक डॉ. प्रवीण त्यागी यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर मध्ये इयत्ता सहावी ते दहावी व जुनिअर कॉलेज मधील विद्यार्थ्यांनाही गणित व विज्ञान या विषयाची स्टेप ॲप माध्यमातून ट्रेनिंग दिले जाणार आहे. स्टेप ॲप हे कॉम्प्युटर गेम आधारित शिक्षणपद्धती असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना सहजतेने व आवडीने हे ॲप हाताळतील आणि त्यातून स्पर्धात्मक माहिती व कौशल्य आत्मसात होणार आहे.

डॉ. प्रविण त्यागी हे जागतिक कीर्तीचे शिक्षणतज्ञ असून त्यांचे अनेक विद्यार्थी आंतररष्ट्रीय स्तरावरील मोठ्या कंपन्यामध्ये उच्च पदी, आयपीएस, आयएएस झालेले आहेत. ट्विटर या समाज माध्यमाचे सीईओ तसेच उबर सिस्टीमचे प्रमुख हे सुद्धा त्यांचे विद्यार्थी आहे. नामदार बाळासाहेब थोरात यांचे स्नेहातून महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील पहिला पॅटर्न ते संगमनेर मध्ये राबवणार आहेत.
संगमनेर तालुक्यातील सह्याद्री शिक्षण संस्थेच्या २४ शाळा, अमृतवाहिनी संस्थेच्या मॉडेल स्कूल व इंटरनॅशनल स्कूल, जयहिंद आदिवासी आश्रम शाळा या विद्यालयांचा यामध्ये समावेश आहे. या अंतर्गत तालुक्यातील सुमारे १२ हजार विद्यार्थ्यांना हे विशेष विशेष ट्रेनिंग निशुल्क मिळणार आहे.

सुपर – ३० या चित्रपटांमध्ये ज्याप्रमाणे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता शोधून त्यांना आयएएस परीक्षेसाठी प्रोत्साहित केले गेले. तोच पॅटर्न या अंतर्गत राबवला जाणार असून याचा सर्व खर्च एकविरा फाउंडेशन उचलणार आहे. या प्रशिक्षणामधून तालुक्यातून दरवर्षी टॅलेंट हंट म्हणून निवडल्या जाणाऱ्या ५० विद्यार्थ्यांना स्वतः डॉ. प्रवीण त्यागी विशेष प्रशिक्षण देणार आहे . त्यातून जागतिक दर्जाच्या स्पर्धात्मक परीक्षेसाठी मुलांना तयार करण्यात येणार आहे. मुंबई – नाशिक – पुणे येथील मोठ्या क्लासच्या खर्चावर होणारा पालकांचा खर्च टळणार असून संगमनेरमध्ये ही अत्यंत गुणवत्तेची अद्यावत सुविधा नामदार बाळासाहेब थोरात व डॉ जयश्री ताई थोरात यांच्या पुढाकारातून सुरू झाली आहे.
अजूनही ज्या शाळांना सुपर संगमनेर प्रकल्पातून आपल्या विद्यार्थ्यांना गणित व विज्ञान विषयाचे विशेष प्रशिक्षण द्यायचे आहे. अशा शाळा व मुख्याध्यापकांनी यशोधन कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन एकवीरा फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉ. जयश्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठ्या स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन – नामदार थोरात
गणित व विज्ञान हे विषय अत्यंत महत्त्वाचे असून या विषयांच्या तयारी बरोबर स्टेपॲप मधून IAS,IPS,NEET,JEE, या मोठ्या स्पर्धा परीक्षा तयारीचे कौशल्य विद्यार्थ्यांना इयत्ता सहावी पासूनच निशुल्क मिळणार आहे. त्यामुळे या गुणवत्तेच्या संगमनेर प्रकल्पाचा फायदा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमधील टॅलेंट शोधण्यासाठी होणार असल्याचे नामदार थोरात यांनी म्हटले असून शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता व सकारात्मकता वाढीसाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावे असे आवाहन केले आहे.
