जयहिंद आदिवासी आश्रम शाळेत प्रवेशोत्सव आनंदात साजरा
प्रतिनिधी —
विविध योजना आणि कार्यक्रमांमधून शैक्षणिकदृष्ट्या नावाजलेल्या संगमनेर तालुक्यातील जयहिंद आदिवासी आश्रम शाळा कोळवाडेचा प्रवेश उत्सव मोठ्या उत्साहात व आनंदात पार पडला.
विद्यार्थी पालक शिक्षक यांनी कोळवाडे गावातून प्रभात फेरी काढून शिक्षणाविषयी जनजागृती केली. यावेळी एकात्मिक आदिवासी विकास निरीक्षक करवर, झरेकर, काशिनाथ गोंधे, भाऊसाहेब नवले, विद्यालयाच्या पर्यवेक्षिका के. एन. कोल्हे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक एस. बी. अंत्रे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या प्रभात फेरीमध्ये सहभागी झाले होते.

ढोल-ताशांच्या आणि घोषणांच्या जयघोषात ही शालेय प्रवेशोत्सव फेरी काढण्यात आली. यानंतर विद्यालयाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी स्वागतगीत म्हणून सर्वांचे स्वागत केले. यावेळी प्रमुख अतिथी यांचा शुभहस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वह्या, पुस्तके, गणवेश यांचे वाटप करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांना शालेय जीवनासाठी करवर यांनी शुभेच्छा दिल्या. विद्यालयाच्या पर्यवेक्षिका कोल्हे यांनी विद्यालयाच्या यशस्वी घोडदौडीचा सविस्तर आढावा घेऊन विद्यार्थी पालक व उपस्थितांना बहुमोल मार्गदर्शन केले. काशिनाथ गोंधे यांनी विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. आरोग्य अधिकारी झरेकर यांनी विद्यार्थ्यांना साथीच्या आजाराविषयी सविस्तर माहिती देऊन जनजागृती केली तसेच आरोग्य सेवक फटांगरे यांनी देखील विद्यार्थ्यांना आरोग्य विषयी मोलाचे मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास विद्यार्थी,पालक,कोळवाडे गावचे नागरिक विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश दिघे यांनी केले, तर सर्व उपस्थितांचे आभार प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक संजय अंत्रे यांनी मानले. कार्यक्रम संपल्यानंतर सर्व विद्यार्थी पालक प्रमुख अतिथी यांना विद्यालयाच्या वतीने भोजन देण्यात आले त्यानंतर शालेय कामकाजास प्रारंभ करण्यात आला.
