अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीची चौकशी सुरू !
कृती समितीच्या वतीने स्वागत !
प्रतिनिधी —
अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीची शिक्षक संचालकांमार्फत चौकशीस सुरू झाली आहे. १६ जून रोजी यासंदर्भातील सुनावणी होणार आहे. शिक्षक व इतर पदांना जी मान्यता मिळाली ती नियमानुसार होती किंवा कसे याबाबत शिक्षक संचालकांच्या मार्फत ही चौकशी होणार आहे. अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी बचाव कृती समितीच्या वतीने या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे.

अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीमध्ये अनागोंदी भ्रष्टाचार व गैरव्यवहार सुरू आहे. शिक्षकांच्या नियुक्त्या करताना ४१ लाखापर्यंतच्या बेकायदेशीर रकमा स्वीकारण्यात आल्याचे आरोप संस्थेवर सातत्याने करण्यात येत आहेत. संस्थेच्या मूळ घटनेमध्ये अत्यंत लोकशाहीविरोधी बदल करून संस्था एका कुटुंबाच्या मालकीची बनवून एकाधिकारशाही निर्माण केली गेली आहे. भ्रष्टाचारात सामील असलेल्या लोकांना किंवा भ्रष्टाचाराला मूकसंमती असलेल्या लोकांना कार्यकारिणीत घेऊन संस्थेच्या कारभाराला एकाधिकारशाहीचे स्वरूप देण्यात आले आहे.

कृती समितीच्या वतीने यासंदर्भात सातत्याने आंदोलने सुरू आहेत. आंदोलनादरम्यान संस्थेचे कायम विश्वस्त मधुकर पिचड यांनी संस्थेतील गैरव्यवहाराची चौकशी करण्याचे मान्य केले होते. संस्थेचे सभासदत्व खुले करून संस्थेत लोकशाही प्रक्रिया बहाल करण्यासाठी घटनेत योग्य ते बदल करण्याचेही मान्य केले होते. मात्र असे केल्याने आपल्या भ्रष्ट एकाधिकारशाहीला सुरुंग लागेल असे वाटल्याने त्यांनी आंदोलकांना दिलेला शब्द फिरवला व आपली संस्थेमधील एकाधिकारशाही सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला. अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी बचाव कृती समितीने यासंदर्भातील आपले आंदोलन सुरूच ठेवले आहे. कायदेशीर मार्गाने सुद्धा याबाबत कारवाई सुरू ठेवली आहे.

आता सरकारने व सरकारच्या शिक्षण संचालकांनी सुद्धा याबाबतची चौकशी सुरू केली असल्यामुळे अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी अंतर्गत सुरु असलेला गैरकारभार भ्रष्टाचार नक्की उघड होईल असा विश्वास कृती समितीच्या वतीने व्यक्त केला जात आहे.
