ग्लोबल वार्मिंगचे संकट थोपवण्यासाठी सौरऊर्जा हा चांगला पर्याय — केंद्रीय राज्यमंत्री कपील पाटील

प्रतिनिधी —
ग्लोबल वॉर्मींगचे संकट थोपायचे असेल तर, कार्बन विसर्ग थांबविण्याशिवाय पर्याय नाही. यासाठी केंद्र सरकारने विशेष पुढाकार घेवून जम्मु मधील पल्लीगावापासून त्याची सुरुवात केली आहे. भविष्यात प्रत्येक गावाला कार्बन क्रेडीटसाठी पुढाकार घेवून सौरउर्जेकडे वाटचाल करावी लागेल असे प्रतिपादन केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपील पाटील यांनी केले.

सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पुण्यतिथी पासुन लोणी बुद्रूक ग्रामस्थांनी आयोजित केलेला अखंड हरिणाम सप्ताह आणि किर्तन महोत्सवाची सांगता पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून करण्यात आली. या निमित्ताने आयोजित केलेल्या अभिवादन कार्यक्रमात कपील पाटील यांनी केंद्र सरकारच्या ग्रामीण विकासाची संकल्पना विषद करुन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील भारत घडविण्यासाठी काम करण्याचे आवाहन ग्रामपंचायतींना केले.

माजीमंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास आमदार राधाकृष्ण विखे पाटील, ह.भ.प उध्दव महाराज मंडलीक, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती राजेंद्र विखे पाटील, भाऊसाहेब विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील, खासदार डॉ.सुजय विखे पाटील, आंबादास पिसाळ, ॲड.बापूसाहेब गुळवे, अशोक खेडकर, राजेश परजणे यांच्यासह विविध संस्थाचे पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते. प्रवरानगर येथील पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्या स्मृतीस्थळावर जावून अभिवादन केले.

पद्मश्रींच्या सहकार चळवळीचा दृष्टीकोन हा रोजगार निर्मितीचा होता. आता हेच उदिष्ठ संयुक्त राष्ट्रसंघाच्या निकषामध्ये आहे त्यावरूनच या जुन्याजाणत्यांचा विचार किती व्यापक होता याचा प्रत्यय येतो. या सर्व व्यक्तिंना समाज घटकांचा सत्सगं लाभल्याने ही व्यक्तिमत्व मोठी झाली. पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कारही या व्यक्तिंमुळे मोठे झाल्याचा गौरवपुर्ण उल्लेख करुन आपल्या भाषणात मंत्री कपील पाटील म्हणाले की, ज्यांना गावाच्या नावाने ओळखले जाते त्यापाठीमागे विचारांची ताकद असते. तुमच्यासारख्या माणसांचा सत्संग असतो म्हणूनच ही असामान्य व्यक्तिमत्व मोठ्या पदापर्यंत पोहोचू शकतात. या कामामधुन सामाजिक परिवर्तन होत आहेच, परंतू जनतेचे आशिर्वादही मिळत असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले.

नुकताच जम्मु येथील पल्ली गावामध्ये संपन्न झालेल्या पंचायतीराज दिनाचा उल्लेख करुन, मंत्री कपील पाटील म्हणाले की, या गावाने कार्बन क्रेडीटमध्ये मोठे काम केले. त्यामुळेच हे गाव आता पुर्णपणे सौरउर्जेवर आले आहे. या गावाने केलेल्या क्रांतीकारी कामाची दखल घेवूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या गावाला प्राधान्याने भेट देवून कौतुक केले.
भविष्यात ग्लोबल वॉर्मींगचे संकट थोपावायचे असेल तर प्रत्येक गावाला कार्बनचा विसर्ग थोपवावा लागेल. यासाठी लोणी बुद्रूक सारख्या ग्रामपचांयतींनी पुढाकार घेतला तर देशाच्या नकाशावर अशी गावं झळकू शकतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. नगर जिल्हृयामध्ये खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रीय वयोश्री योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे झाली या त्यांच्या कामाचे पंतप्रधानांनी केलेले कौतुक ही सामान्य गोष्ट नाही. त्याच्या वयाकडे पाहू नका तर त्यांच्या कर्तृत्वाकडे पाहा असा सुचक सल्लाही त्यांनी दिला.

प्रारंभी आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. ह.भ.प उध्दव महाराज मंडलिक, आण्णासाहेब म्हस्के पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शेवटी खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.
