दगू भाऊमुळे बगळ्याला जिवदान !

पिंपळाच्या झाडावर मांजात अडकलेल्या बगळ्याची सुटका
प्रतिनिधी —
निसर्गाने प्रत्येक जिवाला जगण्याचा अधिकार दिला आहे. मात्र मानव निर्मित संकटांमुळे असंख्य प्राणी आणि पक्षांना आपला जीव गमवावा लागतो. असाच प्रकार संगमनेर शहरातील अमरधाम जवळ घाट मला आहे.
पिंपळाच्या उंच झाडावर चायना मांजात बगळा अडकला. याची माहिती मिळताच जिवाची पर्वा न करता दगुभाऊ रुपवते या तरुणाने झाडावर चढून त्याचे प्राण वाचवले आणि बगळ्याने पुन्हा उंच भरारी घेतली.

या बाबत अधिक माहिती अशी की, संगमनेर शहरातील अमरधाम जवळ एक जूने उंच पिंपळाचे झाड असून या झाडावर अनेक पक्षाचे वास्तव्य असते. रोज हे पक्षी निसर्गात मुक्तपणे संचार करत असतात. मानवाच्या चुकांमुळे हजारो पक्षांना आपला जिव गमवावा लागत आहे. यात सर्वात मोठा शत्रू बनला आहे पतंगांचा चायना मांजा. पक्षांबरोबर मानवाला देखील या चायना मांजामुळे अनेकदा जिवाला धोका निर्माण झाला आहे. पतंग उडवितांना बंदी असतांनाही मुले चायना मांजाचा वापर करतात. हा मांजा मानवासह पक्षांच्या जिवावर उठला आहे. असाच पतंगाचा मांजा अमरधाम जवळील पिंपळाच्या झाडावर होता. एक बगळा उडत या झाडावर आला आणि नेमका चायना मांजात अडकला.

सुरुवातीला बगळ्याने यातून सुटण्यासाठी स्वतःला वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्याच्या जगण्याच्या धडपडीत मुळे आणि सुटण्याच्या धडपडी मुळे तो अधिकच त्या मांजात अडकत गेला. मात्र त्याचे प्रयत्न आणि ताकद अपुरी पडली. अखेर बगळा झाडावरील मांजात अडकला. व तसाच फांदीवर निपचितपणे पडून राहिला.
रस्त्याने जाणारे येणारे नागरिक कुतूहलाने पाहत होते. उंच झाडावर बगळा अकल्याने सुटका कशी करावी याचा काही जण विचार करत असतानाच नागरिकांनी जाणता राजा प्राणी मित्र सर्प मित्र संघटनेला याची माहिती दिली. याची माहिती मिळताच संघटनेचे तालुकाध्यक्ष दगुभाऊ रुपवते हे स्वतः अमरधाम येथे आले. मांजात बगळा अडकल्याचे पाहताच त्यांनी त्यांच्या सुटकेचा निर्णय घेतला. क्षणाचाही विलंब न करता ते पिंपळाच्या झाडावर चढले. मात्र उंच झाडावर एका छोट्या फांदीवर बगळा अडकला होता.

कार्यकर्ते, नागरिकही जमा झाले ते खालून सुचना करत होते. धाडस करत रुपवते हे बगळ्या पर्यंत पोहचले आणि त्यांनी त्याला पकडले. बगळयाच्या शरिरा भोवती अडकलेला मांजा काढला. त्याला खाली आणले. कुठे जखमा झाल्या आहे का याची पाहणी केली. त्याला पाणी पाजले. यामुळे बगळ्यात ताकद निर्माण झाली. तो उडण्यास सक्षम असल्याची खात्री पटताच दगुभाऊ रुपवते यांनी बगळ्याला पुन्हा निसर्गात सोडले. जणू दगुभाऊच्या रूपाने बगळ्याची सुटका झाली. बगळ्याने पुन्हा निसर्गात उंच भरारी घेतली.

